मिशन ऑक्सिजन ला आध्यात्माची साथ (पादुका संस्थान मूंडगाव राबविणार वृक्षारोपण महाअभियान)

66

 

अकोट प्रतिनिधी

मिशन ऑक्सीजन अंतर्गत श्री गजानन महाराज पादुका संस्थान मूंडगाव ता अकोट जि अकोला द्वारे *मिशन प्राणवायू* राबविण्यात येत आहे.
जगतगुरू तुकोबाराय सोळाव्या शतकातच वृक्ष, पर्यावरणाचे महत्त्व सांगून गेले. श्री गजानन महाराजांचा चरित्र “श्री गजानन विजय” या ग्रंथाचा सार सुद्धा वृक्ष, जल संरक्षण असाच आहे.
सध्या आपल्या देशावर कोरोना संकट उभे राहिले आहे. या विषाणूमुळे संपूर्ण मानव जाति संकटात आली आहे. कोरोना या आजारात रुग्णास प्राणवायूची नितांत आवश्यकता भासू लागली आहे. दररोज कित्येक रुग्णांना प्राणवायू आभावी आपले प्राण गमवावे लागले. हॉस्पिटल मधे मोठ्या प्रमाणात प्राण वायूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
याआधी मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी लाखो वृक्षांची अमानुषपणे कत्तल केली आहे. आज लाखो रुपये खर्च करून प्राण वायू मिळत नाही. वृक्ष ही नैसर्गिक ऑक्सिजन बनवणारी एकमेव फॅक्टरी आहे. फुकटचा प्राणवायू देणाऱ्या झाडांची संख्या वाढवण्याची व संगोपन करण्याची नितांत आवश्यकता आहे.
ऑक्सिजन करीता देशात मिशन ऑक्सीजन राबविण्यात येत आहे. त्यात खारीचा वाटा म्हणून श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव चे वतीने दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते पण यावेळी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्या करीता संस्थान द्वारा भव्य रोप वाटीका स्थापन होत आहे. संस्थानच्या वतीने संत नगरी मुंडगाव व परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्याची जोपासना, संवर्धन करण्यासाठी संस्थान सज्ज आहे. तसेच पादुका संस्थान मुंडगाव चे ५३ गावातील २००० पुरुष व महिला सेवाधारी व श्रींचा भक्तांच्या मदतीने त्यांच्या गावात वृक्षारोपण तसेच श्रींच्या भक्तांना श्री चा प्रसाद म्हणून एक प्रासादिक रोप देण्याचा मानस विश्वस्त मंडळाचा आहे.
याआधी कोरोना काळात पादुका संस्थान द्वारे गरजूंना अन्नदान, निर्जंतुकीकरन, कोरोना जनजागृती, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
विश्वस्त मंडळाकडून श्रींच्या भक्तांना, इतर सर्व जाती धर्माच्या धार्मिक संस्थान, युवक मंडळ, समाजसेवी, वृक्षप्रेमीं, लोक प्रतिनिधी, सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, वार्ताहर, पत्रकार यांना विनंती करण्यात येत आहे की आपण आपल्या परीसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून मिशन प्राणवायू मध्ये सहभागी व्हावे.