अवैध लाकूड साठा ताब्यात घेऊन स्मशानभुमीला देण्याची समविचारीची मागणी

0
51

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरीः वनखात्याची परवानगी न घेता बेकायदेशीर वृक्षतोड करुन लॉकडाऊनच्या काळात परजिल्ह्यात विक्री न झालेला लाकूड साठा ताब्यात घेऊन जिल्ह्यातील नजीकच्या स्मशानभूमीत पुरविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात लाकूड तोडीला निर्बंध असूनही वन खात्याच्या दुर्लक्षातून आणि अर्थपूर्ण व्यवहारातून अनेक ठिकाणी बेकायदेशीर वृक्ष तोड करण्यात आली असून यातील लाकूड विक्रेत्या एजंटनी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तोडलेली लाकडे रचून ठेवलेली आहेत.लॉकडाऊनच्या काळात परजिल्ह्यात वाहतूक करणे कठीण जात असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यालगत तोडलेली झाडे रचून ठेवलेली असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या काळात मृत्यूदर वाढल्यामुळे असंख्य स्मशानात जळावू लाकडे संपुष्टात आल्याने कमतरता भासत आहे.समाजातील दानशूर संस्था व्यक्ती यासाठी पुढे आलेल्या आहेत.याबाबत माहिती घेता ग्रामीण भागात परजिल्ह्यातील लाकूड विक्रेते आणि ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर लाकूडतोड करुन तोडलेली झाडे रचून ठेवलेली असल्याचे कळत आहे.याबाबतीत त्या त्या वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना याची इत्यंभूत माहिती असून वन विभाग या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.या बेकायदेशीर वृक्षतोडीला काही राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधी यांचा वरदहस्त असल्याचेही बोलले जात आहे.
बेकायदेशीर साठविलेला हा लाकूड साठा त्वरित ताब्यात घेऊन जिल्ह्यातील अत्यावश्यक असलेल्या स्मशानात तातडीने पुरविण्यात यावा अन्यथा सबंधित प्रशासनाला कायदेशीर मार्गाने जाग आणून दिली जाईल असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये,महासचिव श्रीनिवास दळवी,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा अध्यक्ष अँड.निलेश आखाडे,तालुकाध्यक्ष आनंद विलणकर,बंड्या परकर,आदींनी दिला आहे.

दखल न्यूज भारत