वेतन अनुदानाची मूळप्रत कोषागारात सादर करण्यापासून सूट देण्याची ‘प्रहार’ ची मागणी शाईच्या प्रतीमुळे शिक्षकांच्या पगारास होतोय विलंब.

120

 

अकोट प्रतिनिधी

वित्त विभागाच्या दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार कोषागार कार्यालयात वेतन देयके सोबत अनुदानाची मूळ प्रत (शाईची प्रत) सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे .कोव्हिड१९ च्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत मागील वर्षापासून नियमित वेतन व सेवा निवृत्ती वेतनाचे अनुदान दरमहा शासनाकडून प्राप्त होत आहे.मागील महिन्याचा व्हाऊचर नंबर व शाईची प्रत प्राप्त झाल्यावरच सी.एम.पी.पुर्णत्वास जाते.
त्यानुसार जिल्हा परिषद मार्फत शिक्षक , शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे प्रत्येक महिन्याची वेतन देयक कोषागार कार्यालयात पारीत करण्याकरता सादर केल्या जातात ,वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार कोषागार कार्यालय सादर केलेल्या देयकासोबत अनुदानाची मूळ प्रत सादर केलेली नसल्यामुळे सदर देयके त्रुटी मध्ये परत करीत असून त्यामुळे वेतनास विलंब होऊन शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष निर्माण होत आहे.
सद्यस्थितीत कोव्हिड १९ विषाणूच्या प्रकोपामुळे बऱ्याच रेल्वेच्या फे-या बंद झाल्याने तसेच प्रवासी मार्गावर जिल्हाबंदी व इतर निर्बंध असल्यामुळे ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई तसेच शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे कडून अनुदानाची मूळ प्रत (शाईची प्रत)सादर करण्यास अडचण निर्माण होत असून सध्या प्रवास करताना कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करिता मूळ वेतन अनुदानाची प्रत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर कोषागार कार्यालयात उपलब्ध करून देण्याबाबत च्या हमीपत्रावर अथवा इमेल वर देयके पारीत करण्याबाबत सूचना राज्यातील सर्व जिल्हा कोषागार अधिकारी यांना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व लेखा व कोषागारे वित्त विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे केली असून त्यांच्या प्रतिलिपी लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक ,शिक्षण आयुक्त यांना पाठविल्या आहेत.