नियमित पोषण आहार पोहचवा – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

117

 

प्रतिनिधी
बिंबिसार शाहारे / राहुल उके
दखल न्यूज

भंडारा दि.30; जिल्हयातील एकही बालक पोषण आहाराविना वंचित राहू नये याची काळजी घेवून नियमित पोषण आहार पोहचवा. महिलांवरील अत्याचारावर तसेच घरघुती हिंसेवर नियंत्रण ठेवा, असे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले.

जिल्हा परिषद सभागृहात महिला व बाल विकास विभागाचा आढावा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी काठोळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष रविंद्र दरेकर, जिया पटेल उपस्थित होते.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत बचत गटाचे काम उत्कृष्ट आहे. असे चांगले काम करुन महिला सक्षमीकरणाला चालना दया, असे ना. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. बचत गटाच्या हँडलूम उद्योगाच्या कामास त्यांनी शुभेच्छा दिल्या. दरवर्षी महिला व बाल विकास भवनासाठी जिल्हा नियोजन मधून 1 कोटीचा निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा माहिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा सादरीकरणाद्वारे घेण्यात आला. जिल्हयात आतापर्यंत माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ 1142 लाभार्थ्यांनी 1 कोटी 35 लाख 25 हजार वितरित केले असून जिल्हा राज्यात प्रथम क्रमाकावर आहे. पोषण अभियान अंतर्गत आधार कार्ड सिडींग करण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. महिलांना अस्मिता योजनेचा लाभ देण्यातही जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच जिल्हयामध्ये पोषण परसबाग विकसित करण्यामध्ये 206 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. या उपलब्धीबद्दल यशोमती ठाकूर यांनी महिला व बाल विकास विभागाचे अभिनंदन केले.

जिल्हयात 1305 अंगणवाडी केंद्राची संख्या असून आदर्श आंगणवाडी केंद्राच्या इमारतीसाठी 53 लक्ष निधी मंजूर आहे.एकरकमी लाभाची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. या वेळी तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेसचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, आंगणवाडी बांधकाम, पोषण आहार, माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता योजना, परसबाग योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप ना. यशोमती ठाकूर यांच्या करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, माविमचे प्रदीप काठोळे व विजय नंदागवळी यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, तसेच लाभार्थी उपस्थित होते.