ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी बीएएमएस,बीएचएमएस डॉक्टरांना कोरोना उपचाराची परवानगी दया- सुहास खंडागळे आरोग्य विभागाने याबाबत तांत्रिक बाबी लक्षात घेऊन धोरण ठरवायला हवे,गाव विकास समितीची भूमिका.

51

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

देवरुख:-गाव खेड्यात वाढता कोरोना लक्षात घेता व रुग्णांनी आजार अंगावर काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी खासगी ओपीडी डॉक्टरांना योग्य ते धोरण ठरवून या आजारावरील उपचारांची परवानगी देण्यात यावी,जेणेकरून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होईल आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल,असे मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत ग्रामीण भागातील लोकांत अधिक प्रमाणात निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणा,ग्रामपंचायत आणि दक्षता कमिटी यांनी लोकांचे आजाराबाबत प्रबोधन करणे गरजेचे असून कोणत्याही आजाराच्या रुग्णाला प्राथमिक टप्प्यात उपचार मिळणे आवश्यक आहे असेही सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.सर्दी,वातावरण बदला मुळे होणाऱ्या आजाराकडे देखील भीती मुळे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने लोकांनी समोर येऊन उपचार घ्यायला हवेत असे वातावरण निर्माण व्हायचे असेल तर रुग्णांच्या फॅमिली डॉक्टरांना कोरोना उपचाराची परवानगी मिळायला हवी असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.बीएएमएस व बीएचएमएस हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ आहे.त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे खंडागळे यांनी म्हटले आहे.
एकीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ताण असताना,डॉक्टरांची कमतरता भासत असताना आणि रुग्णांना बेड मिळणे काही ठिकाणी अडचणीचे होत असताना गाव खेड्यात आरोग्य सेवा देणारे तसेच निमशहरी भागात खासगी ओपीडी चालविणारे बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टरांना कोरोना बाधित रुग्णांची तपासणी व उपचार पद्धती योग्य ती काळजी घेऊन करण्यास परवानगी द्यायला हवी.असे केल्यास सौम्य लक्षणे असणाऱ्या व होम आयसोलेशन मध्ये राहणारे पेशंट हे घरच्या घरी बरे होतील व त्यांच्यात भीतीचे वातावरण राहणार नाही असे मत सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत विचार करावा,डॉक्टरांच्या संघटना व प्रतिनिधींशी बोलावे असेही सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.

दखल न्यूज भारत