इंधन दर वाढीपेक्षा खाद्य तेलाच्या किंमतीत झपाट्याने झाली भाववाढ – मुख्य बाजारपेठेतूनच केली जाते भाववाढ, सर्वसामान्य जनतेची झाली गळचेपी

85

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
कोरोना कालावधीत इंधन दर वाढीपेक्षा खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये दर हप्त्याला भाववाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेची गळचेपी होत आहे.खाद्य तेलाची भाववाढ ही तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेतूनच साठवणूक केलेल्या मालामधून केली जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्याच्या घडीला कोरोनाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. शासन स्तरावरुन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रकारची ठोस पावले उचलून कडक बंदोबस्त करण्यात आले आहे.शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून सर्वसामान्य जनता घरीच वास्तव्यास राहून अनेक कुटुंबे कसेबसे उदरनिर्वाह करतांना दिसून येत आहेत.अशातच जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत मोडणारे व पोटाची खळगी भरण्याकरिता अतिआवश्यक असणारे खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये दर हप्त्याला वाढ होत असेल तर अशावेळेस घरी राहून व काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी काय करावे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी ९५ रुपये प्रति किलो खाद्य तेल दर हप्त्याला १० रुपयांची वाढ होऊन हल्ली १७० रुपये प्रति किलो खाद्य तेलाची किराणा दुकानातून विक्री केली जात आहे.किराणा दुकानदारांना भाववाढीबद्द्ल विचारणा केली असता तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेतूनच खाद्य तेलाच्या किंमती भडकल्या असल्याने आम्हाला नाईलाजास्तव चढ्या दराने विक्री करावी लागत असल्याचे काही किराणा व्यावसायिकांनी माहिती दिली.कोरोना काळात हाताला काम नाही व इतरही कामधंदे बंद अवस्थेत असल्याने अशातच खाद्य तेलासाठी एवढी किंमत मोजावी लागणार तर मग घरी बसून भाजीपाला, किराणा सामान,तिखट,मीठ व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता रक्कम कुठून आणावी?असा सवाल जनसामान्यांच्या मनात घर करून सोडत आहे.
यासाठी शासन स्तरावरुन खाद्य तेलाच्या भाववाढी विरोधात व मालाचा साठा करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना तंबी घालणे गरजेचे असल्याचे जनसामान्यांतुन सुर निघू लागले आहे.