पट्टेदार वाघाच्या हल्यात बैल ठार, प्रत्यक्षदर्शी विठोबा झरकर

403

 

ऋषी सहारे
संपादक

गडचिरोली -दि 26 एप्रिल
गडचिरोली शहरापासून अवघ्या 6 किमी अंतरावर ग्रामपंचायत वाकडी अंतर्गत वाकडी मसली मार्गावरील पूलाच्या कडेला शेतात चरत असलेल्या बैलावर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना नुकतीच दुपारी 2.30 ते 2.45 वाजता चे दरम्यान घडली आहे. यामुळे वाकडी म्हसली परिसरात पून्हा एकदा वाघाची दहशत वाढली आहे.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला बैल हा म्हसली येथील रुमाजी राऊत या शेतकऱ्याचा असून त्याची किंमत 10 ते 15 हजाराच्या दरम्यान असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार म्हसली येथील शेतकरी विठोबा झरकर हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार ते वाकडी वरून म्हसली येथे मोटर साईकिलने जात होते. पुलाच्या जवळ जाताच त्यांना बैलांचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी मोटरसाईकिल थांबविली व काय झाले हे शोधण्याचा प्रयत्न करीत असताना एक मोठा पट्टेदार वाघ त्याची उंची जवळपास माणसाच्या कंबरभर म्हणजे अडीच फुटाच्या दरम्यान होती. तो वाघ एक बैल मारून त्याच्या मानेला पकडून ओढून नेत होता. तेवढ्यात आणखी दोन जण मोटरसाईकिल वरून त्याच मार्गाने जात असतांना त्यांना थंबविले व काही क्षणातच एका जाणाऱ्या चारचाकी वाहनाला थांबवून त्यांना हकिकत सांगितली व प्रत्यक्ष वाघ त्या बैलाला मारून ओढून नेतांना दाखविले. या सगळ्यांनी मिळून जोरजोरात आरडाओरडा केला तेव्हा कुठे वाघ तिथून पळून गेला. नंतर ही घटना गावात सांगितली. लोकांनी थोड्याच वेळात घटना स्थळावर गर्दी केली. काहींनी वनविभागाला सुचना दिली. वनविभागाच्या राऊंड ऑफिसर कन्नमवार यांनी आपल्या दोन चौकीदारासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची नोंद घेत पंचनामा केला असून वरिष्ठांना माहिती दिली.
या वर्षातील वाकडी परिसरातील ही पहीलीच घटना आहे. मात्र वाकडी, शिवणी, गुरवळा, विहीरगाव, चांदाळा या परिसरात दोन मोठे वाघ व तीन बछड्यांचा वावर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षी या वाघांनी परिसरात धुमाकूळ घातला होता व मोठ्या प्रमाणावर पाळीव प्राणी ठार केले होते.
शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी व वाघांचा बंदोबस्त करावा अशी या भागातील नागरीकांनी मागणी केली आहे.