अहेरी तालुक्यात नक्षल्यांचा धुमाकूळ पाच वाहनांची केली जाळपोळ मेडपल्ली परिसरात नक्षलवाद्यांनी वाहने पेटवली २६ एप्रिल रोजी केले होते भारत बंदचे आवाहन.

302

 

उपसंपादक /अशोक खंडारे

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात नक्षलवाद्यांनी मेडपल्ली येथील रस्त्याच्या कामावरील पाच वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. पाच वाहनांमध्ये तीन ट्रॉली, एक लेव्हल ट्रॅक्टर आणि दोन टँकरचा समावेश आहे.
याआधी नक्षलवाद्यांकडून २६ एप्रिलला भारत बंदची घोषणा करण्यात आली होती.काल रात्री मेडपल्ली येथे जाळपोळीच्या घटनेने या भागात दहशत निर्माण झाली आहे. मागील एका महिन्यापासून या परिसरात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मेडपल्ली ते तुमीरकसा रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. या कामावर असलेले वाहन मेडपल्ली या गावात ठेवण्यात आले होते. याच वाहनांना नक्षल्यांनी लक्ष्य केले. सर्व वाहने पेटवून देण्यात आली.
जाळपोळ केल्याच्या ठिकाणी नक्षल्यांनी बॅनर लावले आहेत. त्यात समाधान नावाने सरकारने आखलेल्या प्रति क्रांतिकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या प्रहार दमण अभियानाच्या विरोधात एप्रिलमध्ये प्रचार आणि जनआंदोलन उभे करा. २६ एप्रिलला या दमन मोहिमेच्या विरोधात भारत बंद करा, असे आवाहन करण्यात आले.