अखेर देसाईगंज येथे ७५ खाटांचे कोरोना रुग्णालय होणार सुरू -राकाँचे युनूस शेख यांच्या प्रयत्नांना यश

149

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज येथे ७५ खाटांचे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त कोरोना रुग्णालय सुरू करण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी २३ एप्रिल रोजी मंजूरी दिली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव व जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य युनूस शेख यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
युनूस शेख यांनी १४ एप्रिल रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांना देसाईगंज शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १०० खाटांचे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त रुग्णालय सुरू करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती.नगरपरिषदेने १९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना याबाबत पत्रव्यवहार करून प्रतिलिपी युनूस शेख यांना देण्यात आली.जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचा २३ एप्रिल रोजी गडचिरोली येथे दौरा असतांना युनूस शेख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी मिळून संदर्भासहित देसाईगंज या ठिकाणी कोरोना रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अखेर शिंदे यांनी ७५ खाटांचे कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त रुग्णालय देसाईगंज याठिकाणी सुरू करण्यास मंजूरी दिली आहे.
कोरोना रुग्णालयास मंजुरी दिली गेली असल्याने यामुळे देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची या चारही तालुक्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय न होता आवश्यक त्या प्रमाणात उपचार होऊन निदान केले जाणार आहे.सध्या स्थितीत कोरोना रुग्णांकरिता ७५ खाटांचे रुग्णालय सुरू होणार आहे.नंतरच्या कालावधीत आणखी वाढ होण्यास मदत करणार असे शिंदे यांनी सांगितले.पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा व निवेदन सादर करतेवेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट,शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजगोपाल सुलवावार,
महाविकास आघाडी उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य कल्पनाताई तिजारे प्रमख्याने उपस्थित होत्या.