माफी मागत चोरानं परत केली करोनाची लस; जयंत पाटील म्हणाले…

0
107

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
महाराष्ट्र:- करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून औषधाच्या तुटवड्यामुळं अनेकांना जीव गमवावा लागत आहेत. गंभीर अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसारख्या औषधांसाठी अक्षरश: वणवण भटकत आहेत. अशातच औषधांचा काळाबाजार व साठेबाजीसारख्या अमानुष घटना समोर येत आहेत. त्यामुळं चिंता व्यक्त होत असतानाच हरयाणातील एक चोरानं नकळत चोरलेली करोना प्रतिबंधक लस परत केल्याची घटना घडली आहे.

राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी या चोरानं लिहिलेली चिठ्ठी ट्वीट केली आहे. हरयाणातील एका चोरानं हॉस्पिटलमधून चोरी केली खरी, पण आपण चोरी केलेली वस्तू दुसरंतिसरं काही नसून करोना प्रतिबंधक लस आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच त्यानं ही लस परत केली. लस परत करताना त्यानं सोबत एक चिठ्ठीही ठेवली. ‘सॉरी, मला माहीत नव्हतं की ही लस आहे’, असं त्यानं चिठ्ठीत नमूद केलंय.

‘माणुसकी जिवंत आहे’, असं जयंत पाटील यांनी त्याची चिठ्ठी ट्वीट करताना म्हटलं आहे. ‘करोनापासून माणसाचा जीव वाचवू शकणाऱ्या औषधांचा साठा आणि काळाबाजार जे करत आहेत, त्यांनी यातून धडा घ्यायला हवा,’ असंही पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांचं रोख नेमका कुणाकडं आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

देशात करोनाची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. रोजच्या रोज लाखालाखांनी रुग्ण वाढत असून त्यांना सामावून घेण्यासाठी रुग्णालये कमी पडत आहेत. त्यातच करोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत असल्यानं नवा पेच निर्माण झाला आहे. ऑक्सिजनचा तुटवडाही भासू लागला आहे. करोना रुग्णांसाठी काही प्रमाणात उपयोगी ठरत असलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचाही मोठा तुटवडा भासत आहे. केंद्र व राज्य सरकार या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.