पत्रकारांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. अमोल मातेले यांची मागणी….

39

प्रतिनिधी : बाळू राऊत
मुंबई;शुक्रवार दिनांक २३ एप्रिल कोरोना कहरात राज्यभरातील अनेक पत्रकारांचा मृत्यू होत आहे. जनतेच्या सेवेसाठी ‘रात्रंदिनी आम्हा युद्घाचा प्रसंग,’असा लढा देणार्‍या पत्रकारांसाठी मोफत लसीकरण राबवा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड अमोल मातेले यांनी केली आहे. शेती, सहकार, अर्थ व समाजकारणाचा गाढा अभ्यास असलेले
ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचे गुरुवार 22 एप्रिल रोजी निधन झाले. याचदिवशी ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील अमित जंगम, भिवंडीतील रतन तेजे अशा राज्यातील मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकामागोमाग एक पत्रकार कोरोनाने दगावत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अनेक पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. आता दुसर्‍या लाटेतही अनेक जण मृत्यू पावत आहेत. समाजमनाचा आरसा म्हणून पत्रकार जागल्याचे काम करतो. त्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे हे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याप्रश्नी तातडीने लक्ष पुरवून
ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांना मोफत लस तसेच उपचारांची योग्य सोय करावी, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे अ‍ॅड अमोल मातेले यांनी केली आहे.