रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करा – महापौर मुरलीधर मोहळ

51

 

पुणे / प्रतिनिधी : पुणे शहरात सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका सर्वांच्या सहकार्याने विविध पातळीवर उपाययोजना राबवित आहे. मात्र शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता तुलनेने रेमडेसीवीर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा हे आपल्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे, त्यामुळे रेमडेसिवीर आणि मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावेत’, अशी मागणी विभागीय आयुक्त सौरव राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे पुणे महापालिकेच्या वतीने महापौर मुरलीधर मोहळ यांनी केली. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी निधी पूर्ण आम्ही देऊ फक्त दोन्हींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशीही आपली भूमिका आहे. यावेळी सभागृह नेते गणेश बीडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हेही उपस्थित होते. रेमडीसिविर आणि ॲाक्सीजन या दोन्हींचे नियंत्रण राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे.

शहरातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त कोरोना टेस्टींग करण्याबरोबर रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्सची उपलब्धता आणि नागरिकांचे लसीकरण आपण युद्ध पातळीवर करत आहोत. महानगरपालिकेच्या स्तरावर आपले सर्व हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. याशिवाय खाजगी हॉस्पिटल्सचे ८०% बेड्सही ताब्यात घेऊन रुग्णांवर उपचार चालू आहेत. परंतु सद्यस्थितीसंख्येच्या तुलनेल रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा पुरवठा अत्यल्प आहे. परिणामी रेमडेसीवीर इंजेक्शनच्या अभावी बहुसंख्य रुग्ण आपले प्राण गमावत आहेत, ही अत्यंत दुखद बाब आहे. शिवाय २५० मेट्रिक टन ॲाक्सीजन प्रतिदिन शहराला गरज आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिल्यास, पुणे महानगरपालिकेतर्फे स्वखर्चाने ही सर्व इंजेक्शन्स विकत घेऊन शहरातील रुग्णांकरिता सदर इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस आहे असे महापौर मुरलीधर मोहळ यांनी स्पष्ट केले.