धक्कादायक : कचऱ्याच्या आगीत तिघे जण होरपळले; सिंहगड रस्त्यावरील नांदेड येथील घटना.

74

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नांदेड (ता. हवेली) येथील स्मशानभूमीजवळील कचरा डेपोला आग लागून त्यामध्ये तिघे जण होरपळून जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली असून, ग्रामपंचायतीची घंटागाडीही जळून खाक झाली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली आहे.आगीत होरपळलेल्यांमध्ये कचरा गोळा करणारे वृद्ध पती-पत्नी व एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश आहे. वृद्ध पती-पत्नी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भाजले असून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किरकोळ इजा झाली आहे.नांदेड-शिवणे पुलाजवळ नांदेड ग्रामपंचायतीचा कचरा डेपो आहे. येथे नेहमीच कचऱ्याचा खच पडलेला असतो. अग्निशमन दल व स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार किरकोळ आगीच्या घटना या ठिकाणी नेहमीच घडत असतात.काल दुपारच्या सुमारास कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यावेळी तेथे कचरा गोळा करणारे वृद्ध पती-पत्नी व ग्रामपंचायत कर्मचारी आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना जखमी झाले आहेत.
आगीची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रपुख सुजीत पाटील, प्रल्हाद जिवडे, अक्षय नेवसे, ओंकार इंगवले, महेश घटमळ, किशोर काळभोर यांनी घटनास्थळो दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले व रूणवाहिकेला पाचारण करून जखमींना उपचारांसाठी पाठविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामपंचायतीने एका खासगी एजन्सीला कचरा उचलून नेण्याचे टेंडर वार्षिक ३० लाख रुपयांना दिलेले आहे. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांपासून या एजन्सीने कचरा उचलून न नेल्याने याठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीग साचला होता.