पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालय तातडीने जनतेच्‍या सेवेत रूजु करावे – आ. सुधीर मुनगंटीवार पदभरतीची कार्यवाही,  आवश्‍यक यंत्रसामुग्री आदी बाबींची पुर्तता करण्‍याच्‍या द़ष्‍टीने प्रयत्‍नशिल – डॉ. निव़त्‍ती राठोड आ. सुधीर मुनगंटीवार ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला आढावा

120

 

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

चंद्रपूर जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता, चंद्रपूरात रूग्‍णांसाठी बेडस् उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे रूग्‍णांची होणारी गैरसोय लक्षात घेता पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्‍णालयाची बांधुन तयार असलेली इमारत यासंदर्भातील अडचणी तातडीने दुर करून आरोग्‍य सेवेसाठी उपलब्‍ध करावी, अशा सुचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

दिनांक २० एप्रिल रोजी पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालय जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाईन बैठक घेत याबाबत आढावा घेतला. या बैठकीला जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, पंचायत समितीच्‍या उपसभापती ज्‍योती बुरांडे, पोंभुर्णा तालुका भाजपा अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख, गंगाधर मडावी यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असुन हा प्रादुर्भाव किती काळ चालणार आहे  याबाबत कोणीही निश्चित कालावधी सांगु शकत नाही. त्‍यामुळे पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालय कायम स्‍वरूपी जनतेच्‍या सेवेत रूजु करणे आवश्‍यक असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

सदर ग्रामीण रूग्‍णालय जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍याच्‍या दृष्‍टीने पदभरती करण्‍यासंदर्भात कार्यवाही आम्‍ही सुरू केली असल्‍याचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. राठोड यांनी सांगीतले. यासंदर्भात आहार व संवितरण संकेतांक अर्थात डीडीओ कोड अदयाप मिळालेला नाही. तो मिळताच पदभरतीची कार्यवाही पुर्ण करता येईल असेही डॉ. राठोड यांनी सांगीतले. या ग्रामीण रूग्‍णालयासाठी साहीत्‍य सामुग्री, वैदयकीय उपकरणे, यंत्रसामुग्री उपलब्‍ध होण्‍यासाठी सहसंचालक रूग्‍णालये यांना प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला असुन प्रस्‍तावाला मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही करण्‍यात येईल. निवासस्‍थानाचे बांधकाम सुरू झाले असुन आवश्‍यक सर्व बाबींची पुर्तता झाल्‍यानंतर रूग्‍णालय जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍यात येईल अशी माहीती जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांनी दिली. सदयस्थितीत प्राथमिक आरोग्‍य केंद्रात कोविड केअर सेंटर, लसीकरण केंद्र सुरू असुन त्‍यामाध्‍यमातुन कोरोना प्रतिबंधक उपचार नागरिकांना मिळत असल्‍याचे डॉ. राठोड म्‍हणाले. सदर ग्रामीण रूग्‍णालयाचा शुभारंभ करत उत्‍तम आरोग्‍यसेवा जनतेला मिळावी यासाठी आवश्‍यक बाबींची तातडीने पुर्तता करण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या. याबाबत आवश्‍यकता भासल्‍यास आपणही पाठपुरावा करू असे त्‍यांनी आश्‍वस्‍त केले.