बावडा येथे दि. 20 ते 30 एप्रिल पर्यंत कडकडीत लॉकडाऊन- सरपंच किरण पाटील.

45

 

निरानरशिंहपुर दि.19: प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार. 

बावडा येथे कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने रुग्ण संख्येचा आकडाही वाढत चालला आहे. या परिस्थितीत बावडा गावामध्ये काल रविवारी तब्बल 30 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कोरोनाची साखळी तोडणेसाठी बावडा गावामध्ये उद्या मंगळवार (दि. 20) पासून दि. 30 एप्रिल पर्यंत 11 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय सोमवारी (दि.19) झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहीती सरपंच किरण पाटील व उपसरपंच निलेश घोगरे यांनी दिली.

बावडा गावातील अनेक नागरिक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले शिवाय सध्या मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त नागरिक हे सरकारी व खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यातील कांहींची परिस्थिती चिंताजनक आहे. गावात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर कोरोनाची साखळी तोडली नाही तर गावातील नागरिकांना मोठ्या संख्येने कोरोनाची लागण होईल. त्यामुळे  गावचे नागरिक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामपंचायतीने बैठक घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी सूचना केली. त्यानुसार श्री शिवाजी विद्यालयामध्ये व्यापारी, पोलीस, महसूल, आरोग्य विभागाचे अधिकारी यांची सकाळी बैठक झाली. या बैठकीस अशोकराव घोगरे, उदयसिंह पाटील, विजय घोगरे, तुकाराम घोगरे व ग्रामपंचायतीचे  पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये गावातील  कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा झाली व सर्वांनी चिंता व्यक्त केली. जर परिस्थितीकडे  दुर्लक्ष केले तर अनेक नागरिकांना कोरोनाची लागण होईल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित होऊन, नागरिकांचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या लॉकडाउनमधून दवाखाने, मेडिकल स्टोअर्स व पेट्रोल पंपांना वगळण्यात आल्याचे सरपंच किरण पाटील यांनी सांगितले. याबैठकीत त्यांनी बावडा गावातील वय वर्षे 45 पुढील सर्व नागरिकांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, असे आवाहनही केले .

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील इतर गावेही बावडा गावाप्रमाणे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत लॉककडाउनचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

_______________________________

– फोटो

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160