लोटे औद्योगिक वसाहतीतील समर्थ केमिकल्स स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापन विरोधात गुन्हे दाखल करण्याची समविचारी मंचची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

131

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील समर्थ, केमिकल्स या कंपनीमध्ये आज झालेला स्फोट ही घटना गंभीर असून या स्फोटासह मागील सहा महिन्यात झालेल्या अशा सहा घटनांची चौकशी करुन मनुष्य जीवीत हानीला जबाबदार असणाऱ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र समविचारी मंचने केली आहे.
आज ई-मेलच्या माध्यमातून याबाबतचे सविस्तर निवेदन समविचारीचे सर्वस्वी बाबा ढोल्ये,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीकांत दळवी,युवाध्यक्ष अँड.निलेश आखाडे,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,तालुकाध्यक्ष आनंद विलणकर,राज्य समन्वयक राधिका जोगळेकर,संघटक तनुजा जोशी,आदींनी हे निवेदन सादर केले.
या निवेदनात समर्थ केमिकलला आज लागलेली आग ही गेल्या सहा महिन्यातील सहावी घटना असून रासायनिक प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ आणि सुरक्षाव्यवस्थेतील ढिसाळपणा कारणीभूत असून आग प्रतिबंधक उपाययोजनेतील कुचराई या गोष्टी कारणीभूत असल्याचे मागील लागलेल्या आगी आणि महाभयंकर स्फोट पहाता दिसून आलेले आहे.मनुष्य हानी होऊनही या होणाऱ्या प्रकारावर राज्य वा केंद्र शासनाच्या जबाबदार यंत्रणा लक्ष देत नाहीत ही लाजीरवाणी बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लोटे औद्योगिक माळावर रासायनिक उद्योगांमध्ये होणारे स्फोट आणि त्या मागील कारणे जाहीर करावीत,या दुर्घटनेला जबाबदार कंपनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह ज्या शासकीय यंत्रणेचे जबाबदार प्रतिनिधी यांनी हलगर्जीपणा केला आहे अशांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत.कंपनीच्या साधनसुविधांच्या अक्षम्य बेपर्वाईचा फटका गरीब निरपराध कामगारांना बसलेला असून गेल्या वीस वर्षात अनेकांना आपले जीव गमवावे लागले असल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील घटनांचा आढावा घेता कंपनी अंतर्गत आग प्रतिबंधक साधनांचा प्रमाणित खबरदारीतील निर्देशांच्या अंमलबजावणीतील बेफीकीरी,प्रशिक्षित सुरक्षा साधनांचा अभाव,इतकेच नव्हे तर अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहिती नुसार जुन्या साधनसामग्रीतील धोकादायक बाब निदर्शनास आणून देऊनही आवश्यक बदल न केल्याने कंपनीच्या बेपर्वाईतून असे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबतीत योग्य तितकीच कठोर कायदेशीर अंमलबजावणी न केल्यास या औद्योगिक भागात जर असे वारंवार घडत गेले तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल समविचारीचे बाबा ढोल्ये,संजय पुनसकर यांनी केला असून प्रशासकीय साटे लोट्यातून आणि स्थानिक राजकीय आश्रयाने कंपनीचे व्यवस्थापन मुजोर झाले असून त्यातूनच हे वाढते प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.यासाठी वारंवार सुरु असणाऱ्या या स्फोटामागील कारणे शोधून सबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी या निवेदनाधारे उद्योगमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

दखल न्यूज भारत