भाऊ…. कोरोना रिपोर्ट खरी पाहिजे की खोटी पाहिजे फक्त सांगा ? पोलिसांनी केले 2 आरोपींना अटक

258

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

पुणे : कोरोनामुळे राज्यातील स्थिती बिकट झाली असून आरोग्य सुविधांच्या अभावी लोकांचा जीव जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागात एका लॅबमार्फत कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी आजवर अनेक नागरिकांना बनावट रिपोर्ट दिल्याची कबुली दिली आहे. सागर अशोक हांडे ( 25) रा. संगम चौक, मु.नांदेड, दयानंद भिमराव खराटे (21) रा. वारजे माळवाडी अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना बेड्या ठोकण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे.
जंगली महाराज रोडवर असलेल्या एका लॅबमध्ये बनावट कोरोना तपासणीचे रिपोर्ट दिले जात होते. लॅबमधील सागर अशोक हांडे आणि दयानंद भिमराव खराटे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात बनावट रिपोर्ट देणारे असे किती समाजकंटक आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना असे बनावट रिपोर्ट दिले जात असतील तर संसर्गाची साखळी तुटणार कशी, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.