कोरोना लसीकरणासाठी घर ते केंद्र मोफत प्रवास मोहीम – सभापती विजय कोरेवार यांचा उपक्रम

44

सावली -(सुधाकर दुधे )राज्यात कोरोनाचे संकट वाढत असतांना 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणाची सुविधा आहे मात्र ग्रामीण भागात लसीकरणाबाबत गैरसमज असल्यामुळे व लसीकरण केंद्रापर्यंत प्रवासाची सोय नसल्यामुळे लसीकरण कमी होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी त्यांचे क्षेत्रातील गावात घर ते लसीकरण केंद्र मोफत प्रवास मोहीम हाती घेतली आहे.
कोरोना लस घेतल्यामुळे मृत्यू होऊ शकतो, लस घेतेवेळी कोरोना चाचणी करतात, लस घेऊनही कोरोना होते अशा अफवांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यास उत्सुक नाही. हा अनुभव सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांचे लक्षात आला. लोकप्रतिनिधी फक्त पाच वर्षात निवडणुकीचे काळात संपर्कात येत असतात पण सभापती विजय कोरेवार हे नेहमी लोकांच्या संपर्कात राहून काम करीत असतात. त्यांनी एक मोहीम सुरू केली असून त्यांचे क्षेत्रातील प्रवासाची सोय नसलेल्या आदिवासी जंगल भागात प्रत्यक्षात जाऊन नागरिकांना समजावून लसीकरणासाठी तयार करीत आहेत व घर ते लसीकरण केंद्रापर्यंत मोफत प्रवासाची व्यवस्था स्वखर्चाने करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे त्या भागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत