देसाईगंज येथे कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटरयुक्त शंभर खाटांचा दवाखाना सुरु करा – राकाँचे प्रदेश संघटक सचिव युनूस शेख यांची मागणी

114

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज शहर व परिसरातील ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने देसाईगंज येथे कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटरयुक्त शंभर खाटांचा दवाखाना सुरू करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य युनूस शेख यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांना १६ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
देसाईगंज ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून याठिकाणी गोंदिया,भंडारा,चंद्रपूर व गडचिरोली याठिकानाहून खरेदी-विक्री करीता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक व नागरिक येत असतात.चारही जिल्ह्याचे मुख्य भाग म्हणजे देसाईगंज नगरी होय.सध्या देसाईगंज शहरात व तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर झपाट्याने वाढत चालली आहे.कोरोना रुग्णांना ऑक्सिजनसाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता असते.परंतु अशी व्यवस्था ग्रामीण रुग्णालय देसाईगंज वा कोरोना सेंटरला नसल्याने कोरोना रुग्णांना गडचिरोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात रेफर करावे लागत आहे.रेफर करुनही रुग्णांची गैरसोय होत असल्याने देसाईगंज येथे कोरोना रुग्णांकरीता व्हेंटिलेटरयुक्त शंभर खाटांचा दवाखाना सुरू करण्यात यावा अशी मागणी युनूस शेख व त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
निवेदन सादर करण्यात आल्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना नगरपरिषदेद्वारे याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची सकारात्मक चर्चा करण्यात आली.
निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटनिस श्याम धाईत,देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके,तालुका उपाध्यक्ष रोशन शेंडे,सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष भुवन लिल्हारे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल पुसतोडे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कपील बोरकर,प्रतिभा साखरे,वंदना नैताम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ प्रामुख्याने उपस्थित होते.