डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपनाने साजरी करा :- जिल्हाधिकारी…

144

 

गडचिरोली :- येत्या दिनांक 14 एप्रिल रोजी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत साधेपनाने सकाळी 7.00 वाजेपासून संध्याकाळी 8.00 वाजण्यापुर्वी साजरी करून सद्यस्थितीत असलेल्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करूया असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून जयंती साजरी करणेबाबतचे मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. त्यानूसार जिल्हाधिकारी यांनी जयंती साजरी करताना काय करावे व काय करू नये याबाबत आदेश जारी केले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्ताने प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी काढण्यात येऊ नयेत. त्याएैवजी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सनिटायझर इत्यादी ) पालन करुन परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी असे आदेशात नमूद आहे. तथापी, चैत्यभुमी , दादर, मुंबई येथे परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देणेसाठी मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित रहाणार असल्याने सदर कार्यक्रमासाठी 50 पर्यत व्यक्ती उपस्थित राहू शकतील, तसेच दिक्षाभुमी नागपूर येथील कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहू शकतील.

कोवीड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंती निमित्त चैत्यभुमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे न येता घरातुनच परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाटय इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कव्दारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा.रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल, तथापी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करतांना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असे सूचविण्यात आले आहे. राज्यातील कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.