नागपुरातील मन हेलावणारी घटना; दोन विद्यार्थिंनीवर बलात्कार

397

 

हर्षे साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

नागपूर:- शहरातील शांतीनगर आणि कोराडी हद्दीत दोन घटनांमध्ये दोन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या उघडकीस आल्या असून एका घटनेत आरोपीला अटक केली असून दुसर्‍या घटनेत विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे.

पहिली घटना शांतीनगर हद्दीत घडली. पीडित 17 वर्षीय मुलीला वडील नसून आई, आजी, भाऊ आणि बहिणीसोबत ती राहते. पीडित मुलगी ही त्याच परिसरातील एका शाळेत शिकते. पीडित मुलीची आई ही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविते. आईला हातभार म्हणून मुलगी देखील त्याच परिसरात एका ठिकाणी मोलकरणीचे काम करीत होती. ज्याठिकाणी मुलगी कामाला जात होती त्याच्या बाजूलाच एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामावर खरबी येथील राजू कोटरंगे (32) हा कामाला होता. मुलगी रस्ताये येजा करीत असल्याने त्याची तिच्यावर नजर होती.

10 एप्रिल रोजी सायंकाळी काम संपवून मुलगी घरी जात होती. त्याचवेळी राजू हा दुचाकीने तिच्याजवळ आला आणि ‘चलती क्या’ असे म्हटले. घाबरल्याने मुलगी आपल्या घरी निघून गेली. रविवारी सायंकाळी मुलगी काम आटोपून घरी जात असताना राजू दुचाकीने तिच्याजवळ आला. तिचा हात पकडून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे जबरीने तिला दुचाकीवर बसवून कोराडी हद्दीत आर्यनगर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. रात्री 8 च्या सुमारास मुलगी घरी आली. तिच्या आईने तिला विचारणा केली असता ती थातुरमातूर उत्तरे देऊ लागली. मुलीच्या आईने तिला सक्तीने विचारणा केली असता तिचे बिंग फुटले. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून राजू कोटरंगे यास अटक केली.

कोराडी येथेही बलात्कार

एकाच महाविद्यालयात शिकणार्‍या एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलगी आणि विधी संघर्षग्रस्त मुलगा हे एकाच महाविद्यालयात शिकतात. त्यांच्यात मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 10 एप्रिल 2020 रोजी मुलाने तिला पांजरा येथील झुडुपात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर तिला या संबंधाची माहिती तिच्या वडिलांना सांगण्याची धमकी देत फेब्रुवारी 2021 पर्यंत तिच्यावर बलात्कार केला. मुलीला दिवस गेल्याने तिची प्रकृती बिघडली. तिला सक्करदरा येथील हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी दाखल केले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले.