देशी,विदेशी दारू मिळत नसल्याने तळीरामांचा गावठी दारू पिण्याकडे वाढला कल – गावठी दारू पिण्यासाठी दररोज लागतात रांगा,पोलीस विभागाचे दुर्लक्ष

149

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यात देशी,विदेशी दारूचा तुटवडा असल्याने तळीरामांचा गावठी दारू पिण्याकडे कल वाढून ग्रामीण भागात गावठी मोहफुलांची दारू पिण्यासाठी दररोज रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.गावठी दारू विक्रेत्यांकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष असल्याने भेसळयुक्त दारू विक्रीचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
देसाईगंज पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार डॉ.विशाल जयस्वाल रुजू होताच अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.दररोज तालुक्यातील देशी,विदेशी अवैध दारू पकडून कारवाईचा सपाटा सुरू आहे.ठाणेदारांच्या कारवाईमुळे तालुक्यात देशी,विदेशी दारू मिळणे कठीण झाले आहे.काही बलाढ्य दारू विक्रेते कारवाईमुळे लांबच्या प्रवासावर गेले असल्याची खमंग चर्चा सुरू आहे.देसाईगंज येथे देशी,विदेशी दारू मिळणे कठीण झाल्याने दारू पिणारे गावठी मोहफुलांच्या दारूच्या शोधात गावोगावी भटकंती करतांना दिसून येत आहेत.गावठी दारूचा महापूर सध्या स्थितीत ग्रामीण भागात जोर धरू लागला आहे.गावठी दारू स्वस्त दरात मस्त असल्याने तळीरामांचा कल वाढला आहे.
ठाणेदारांच्या कारवाईमुळे दारू विक्रेते घरी दारू न विकता गावाशेजारी दारू विक्री करीत आहेत.काही गावठी दारू विक्रेते भेसळयुक्त दारू विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येते.गावठी दारूमध्ये युरिया खत,नवसागर,गुंगी येणारी औषधे,झाड पत्ति व इतर साहित्य पदार्थांची मिलावटी करून दारूची विक्री करीत आहेत.
गावठी दारू विक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी खेळून मिलावटी करून दारू विक्री करीत असल्याने दारू विक्रेते मालामाल व पिणारे कंगाल अशी अवस्था झाली आहे.यासाठी अवैध गावठी दारू विक्रेत्यांच्याही मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे जनसामान्यांतुन बोलल्या जात आहे.