माजी लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन यांना लाेकमान्य टिळक स्मारकाचा ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार जाहीर

68

 

प्रतिनिधी : (ओंकार रेळेकर)

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा ‘अपरान्त भूषण’ हा पुरस्कार लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि चिपळूणच्या सुकन्या सुमित्राताई महाजन यांना जाहीर करण्यात आला आहे.
संचालक मंडळाने एकमताने यावर्षी सुमित्राताईंना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे. विशेष म्हणजे उद्या १२ एप्रिलला सुमित्राताईंचा वाढदिवस असतो. ६ जून २०१४ रोजी सुमित्राताईंची सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. सुमित्राताईंनी आपल्या कार्यकाळात लोकसभाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने ठसा उमटविला आहे. साध्वी अहिल्याबाईंच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या नाटकाचा यात विशेष उल्लेख करावा लागेल. तसेच रामायण आणि महाभारत यावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष, नाटककार अरविंद तथा अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्राच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे पहिले मानकरी नामवंत इतिहास संशोधक आणि डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे हे होते.कोरोना संक्रमणाची तीव्रता कमी होताच पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल’, असे ‘लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, माजी अध्यक्ष अरुण इंगवले, उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत आणि कार्यवाह धनंजय चितळे यांनी सांगितले.

*दखल न्यूज भारत.*