येत्या खरीप हंगामासाठी घरचे चांगले सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे – कृषी विभागाचे शेतकरी बांधवांना आवाहन

155

 

वणी : परशुराम पोटे

मागील खरीप हंगामात, अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे प्लॉट चे झालेले नुकसान आणि कोरोना मुळे सुरू असलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे भविष्यात पेरणीसाठी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो तसेच मागील खरीप हंगामातील सोयाबीन बियाणे उगवण बाबतच्या तक्रारी पाहता येत्या खरीप हंगामात बियाणे उत्पादक कंपन्या बियाणे विक्रीस पाठ फिरविण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्यांच्या उगवनक्षमतेबद्दल ही तेवढी विश्वासार्हता राहिली नाही, त्यामुळे घरचे चांगले सोयाबीन बियाणे येत्या खरीप हंगामाकरिता राखून ठेवण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा श्री जगन राठोड व तालुका कृषी अधिकारी वणी श्री सुशांत माने यांनी केले आहे.
सोयाबीन पीक हे स्वयंपराग सिंचित व सरळ वाण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षीच बाजारातून नवे बियाणे विकत घेण्याची आवश्यकता नाही. शेतकरी बांधवानी आपल्या गरजेनुसार क्षेत्र निश्चित करून आपल्याकडील मागील हंगामातील आवश्यक तेवढे सोयाबीन बियाणे राखून ठेवावे आणि जास्तीचे इतर बियाणे आपल्या गावातील इतर शेतकरी बांधवाना पेरणीसाठी पुरवावे सध्या सोयाबीन चे दर वाढल्यामुळे उत्पादक शेतकरी सोयाबीन बाजारात विक्री करण्याची शक्यता आहे, सध्या 55 ते 60 रुपये प्रति किलो या दराने विक्री करून तेच सोयाबीन नंतर कंपन्यांकडून 100 ते 120 रुपये प्रति किलो प्रमाणे घेण्यात शेतकरी बांधवांनो आपलेच नुकसान आहे कारण येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांच्या तुटवड्यामुळे भाववाढ शक्य आहे यामुळे शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरावे व बियाण्यावर होणारा जादा खर्च टाळून आपला उत्पादन खर्च कमी करावा. बियाणे साठवणूक करतांना सोयाबिन बियाणे हे अतिशय नाजूक असल्याने विशेष काळजी घ्यावी, गोणपाटामधेच बियाणे साठवावे, पोते भिंतीच्या अंतरावर लाकडी पाटीवर एकावर एक तीन पोत्यापर्यंत हवेशीर व कोरडया जागेत साठवावेत. घरच्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहावी उगवण क्षमता चांगली असल्यास शिफारशीनुसार हेक्टरी बियाणे वापरावे, पावसात भिजलेले बियाणे वापरू नये, काडी कचरा असलेले बियाणे स्वच्छ करून पेरणीकरिता वापरावे, पेरणी पूर्व बियाण्यास बुरशीनाशक तसेच रायझोबिअम ची बीजप्रक्रिया अवश्य करावी, पेरणी ही 3 ते 4 सेमी खोलीवर जमिनीत पुरेसा ओलावा असल्यावर रुंद सरी वरंबा पद्धतीनेच करावी, सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया तसेच पेरणी संदर्भात काही अडचणी असतील तर आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुशांत माने यांनी केले आहे.