सद्गुरू स्वीट मार्टमधून ७८ किलो तंबाखू व सिगारेट जप्त – आरमोरी नप, पोलिस स्टेशन, महसूल विभाग व मुक्तिपथची संयुक्त कारवाई

205

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

आरमोरी :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरी सुद्धा जिल्ह्यात चोरट्या मार्गाने अवैध सुगंधित तंबाखूची विक्री सुरुच आहे. आरमोरी शहरातील एका दुकानातून आरमोरी नगर परिषद , महसूल विभाग, पोलिस स्टेशन व मुक्तिपथ तालुका चमूने ७८ किलो तंबाखू ,१ हजार २०० रुपये किंमतीचे सिगारेट व ९० किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. याप्रकरणी दुकान धारकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्यासह जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सुरु आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे किराणा दुकानातून फक्त खाद्य पदार्थांची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व मृतक रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत तंबाखूजन पदार्थांची विक्री सुरुच आहे.

आरमोरी शहरातील सद्गुरू स्वीट मार्ट मधून तंबाखू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे नगरपरिषद, महसूल विभाग, पोलिस स्टेशन व मुक्तीपथने संयुक्तरित्या मोहीम राबवित त्या दुकानाची तपासणी केली. यावेळी दुकानात ७८ किलो तंबाखू, ९० किलो प्लॅस्टिक व १ हजार २०० रुपयांचा सिगारेट आढळून आल्या. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत दुकान मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा तंबाखूची विक्री न करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा सदर दुकानदारावर तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मोहिमेत नायब तहसीलदार संजय राठोड, मुख्याधिकारी डॉ.माधुरी सलामे, पाणीपुरवठा व स्वच्छता इंजि.नितीन गौरखेडे, कार्यालय अधीक्षक ओसीन मडकाम, सहा.कर निरीक्षक बा.रा.पिंपळे, तलाठी पी जी गजभिये, महसूल सहाय्यक संदीप तुपट, पतीराम मडावी, पो.ना रमेश वातूजी लिंगायत, मुक्तीपथ चे तालुका संघटक व नप.चे कर्मचारी गिरीश बांते योगेश दुमाणे, राजू कांबळे, इंजि. प्रदीप मेश्राम, सिटी को अरडीनेटर निखिल निखारे, विशाल सपाटे, सत्यवान कोडाप, सुभाष चौधरी, दिलीप काणतोडे, हरिदास शिलार, इत्यादी कर्मचारी सहभागी होते.