मुलीचा विनयभंग आरोपीस आणि त्याला मदत करणाऱ्या मित्रास 20 वर्षाचा कारावास (जेल)व दंड देसाईगंज तालुक्यातील घटना

366

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

देसाईगंज:- अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत आणि तिला लग्नाचे आमिष देत बळजबरी करणाऱ्या युवकाला आणि त्याला या कामात सहकार्य करणाऱ्या त्याच्या मित्राला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.मेहरे यांनी प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावली . तसेच दोघांनाही प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला . देसाईगंज तालुक्यातील एकलपूर येथील पीडित मुलगी ( वय १४ वर्ष ) दोन वर्षांपूर्वी विहीरगाव येथे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आपल्या आजोबाला मदत करण्यासाठी आली होती . दरम्यान तिचे आजोबा नातेवाइकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना ती घरी एकटीच होती . याची माहिती मिळाल्याने आरोपी मुकेश जयपाल कुतरमारे ( २३ ) रा.मोहुर्णा , ता.लाखांदूर याच्यासह आरोपी तुळशीदास किसन तुपटे ( ३५ ) रा.एकलपूर आणि आरोपी मंगेश बाजीराव भानारकर( २८ ) रा.मोहुर्णा ता.लाखांदूर हे पीडित मुलगी असलेल्या घरी गेले . पाणी पिल्यानंतर काही वेळाने तुळशीदास व मंगेश हे खर्रा खाण्यासाठी म्हणून बाहेर गेले . त्यानंतर मुकेशने तिच्याशी बळजबरी केली . काही वेळानंतर बाहेर गेलेले मुकेशचे दोन्ही सहकारी तिथे आले . तुळशिदासने तू मुकेशसोबत त्याच्या घरी जा , मी तुझ्या आई – वडिलांना सांगितले असे खोटे सांगून त्याच्यासोबत तिला पाठवले . मुलीचे आजोबा लग्नावरून परत आले असता मुलगी घरी नव्हती . दुसऱ्या दिवशी तिची शोधाशोध सुरू असताना ती तुळशिदासच्या दुचाकीवरून परत येताना दिसली . झालेल्या प्रकारावरून पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली . या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड.अनिल प्रधान यांनी बाजू मांडली . कोर्ट पैरवी पीएसआय गव्हारे आणि नारायण बच्चलवार यांनी केली .