देसाईगंज गोकुलनगर येथे गावठी दारूचा महापूर -पोलीस विभागाचे दुर्लक्ष,परिसरातील नागरिक त्रस्त

69

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या तुळशी मार्गे गोकुलनगर येथे गावठी मोहफुलाच्या दारूचा महापूर असल्याने दारू पिणाऱ्या व धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांच्या त्रासापासून परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
दररोज दिवसाढवळ्या व सायंकाळच्या सुमारास गावठी मोहफुलांच्या दारू विक्रीसाठी २० ते २५ घरांची वस्ती असलेले गोकुलनगर हे प्रसिद्ध ठिकाण आहे.सध्या स्थितीत देसाईगंज पोलिस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार डॉ.विशाल जयस्वाल यांनी सर्वच परिसरातील दारू विक्रेत्यांच्या व अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून अवैध धंदे बंद केले आहेत.देसाईगंज व इतर ठिकाणी देशी,विदेशी दारू मिळत नसल्याने दारू पिणारे गोकुलनगर येथे गावठी दारू पिण्यासाठी रांगा लावतांना दिसत आहेत.कमी वस्तीच्या गोकुलनगर येथे जवळपास १२ ते १५ गावठी मोहफुलांची दारू विक्रेते कार्यरत आहेत. जणूकाही या विक्रेत्यांना परवाना मिळाला आहे की काय?अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोहफुलांच्या सडव्या करीता भले मोठे मातीचे माठ व ड्रमचा वापर केला जातो.
गोकुलनगर बाह्य परिसरात असल्याने याकडे पोलीस प्रशासनही दुलक्ष करीत आहे.मात्र याठिकाणी गावठी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्यानेच गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढून भांडणे व कलह वाढीचेही प्रमाण गोकुलनगर येथे वाढीस लागले आहेत.याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष न करता गोकुलनगर येथील गावठी दारू विक्रेत्यांच्याही मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे जनसामान्यांतुन बोलल्या जात आहे.