मनोहर भिडेंनी तोडले अकलेचे तारे, कोरोना मानसिक आजार आहे

146

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांनी आज येथे केले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. मनोहर भिडे याआधी देखील अशाच बाष्कळ वक्तव्यावरून कित्येकदा चर्चेत आले आहेत .

मनोहर भिडे म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे. मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्‍न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही.’. पुढे बोलताना त्यांनी ‘ कोरोना हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे ‘ असे म्हटले. स्वतःला गुरुजी अशी उपाधी लावून भिडे यांची गलिच्छ असलेली भाषा आज पहायला मिळाली.

आम्ही सांगलीकर सह भाजपच्या नियोजनात आज सांगलीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक शेखर माने आदी सहभागी झाले. त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. या बैठकीत मनोहर भिडे हे मास्क न लावता बसले होते. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जवळपास सहा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.