दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

0
281

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
मुंबई:- दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक मार्ग वेगवेगळे असल्याने या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर नववी आणि अकरावी परिक्षांबाबतचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात सोमवारपासून जाहीर केलेल्या कडक निर्बंधांमुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात परीक्षांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षाबाबतीत निर्णय बुधवार किंवा गुरुवारी जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे गतवर्षी प्रमाणेच प्रमोट करण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आज झालेल्या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाईनच होणार असा निर्णय घेण्यात आला. तर ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढल्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

दहावीच्या परीक्षेला सुमारे १७ लाख, तर बारावीच्या परीक्षेला १५ लाख विद्यार्थी बसणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. यामुळे दोन आठवड्याचा कालावधी या परीक्षेला आहे. दरम्यान कोरोनाची परिस्थिती आणि रुग्णसंख्या यावर सर्व अवलंबून होते. परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचाच निर्णय झाला आहे.