महाआघाडीच्या शासनाने रत्नागिरीतील व्यापारी – व्यावसायिक यांच्या संयमाचा अंत पाहू नये तसेच धरसोड धोरण सोडावे – ॲड. दीपक पटवर्धन

0
39

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : राज्यशासन कोरोना स्थिती हाताळण्यात असफल आहे. राज्यशासनाचे धोरण धरसोड वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. वीकएन्ड लॉक डाऊन असं सांगत आता संपूर्ण व्यवसायिक – व्यापारी यांना व्यापार बंद ठेवण्यास भाग पाडले जात आहे. कोव्हीडच्या कालखंडात गेल्या वर्षी सर्वांचेच अर्थकारण बिघडले. आता नव्याने लॉकडाऊन लावल्याने व्यापारी – व्यावसायिक हे हतबल होताना दिसत आहेत. गत आर्थिक वर्षातल्या लॉकडाऊनचा उपयोग करत आवश्यक मेडिकल तसेच अन्य सुविधा उभारण्याचे काम राज्यशासनाने गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे आजची कोव्हीड स्थिती उद्भवली आहे. सातत्याने लॉकडाऊन हा मार्ग प्रभावी ठरणार नाही. लसीकरणाचा वेग वाढवणे, कोरोना टेस्ट वाढवणे, लोकांना गर्दी करण्यापासून परावृत्त करणे, मास्क वापर, सॅनिटायजेशन आणि सुरक्षित अंतर यासाठी पाठपुरावा करणेबरोबर पर्याप्त मेडिकल सुविधा उपलब्ध ठेवणे आवश्यक असतांना सरकार लॉकडाऊनचा मार्ग अवलंबत आहे. त्याही बाबत स्पष्टता न देता राज्यशासनाने जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून लॉकडाऊन लादला आहे.
रत्नागिरीतील जनजीवन, व्यापारी – व्यावसायिक हे शांत वृत्तीचे आहेत. सहकार्याची भूमिका ठेवणारे आहेत. त्यांच्या संयमाचा स्थानिक प्रशासनाने अंत पाहू नये. तात्काळ येथील परिस्थिती राज्य सरकारच्या नजरेस आणुन देऊन व्यापारी – व्यावसायिक यांच्या मागण्यांबाबत निर्णय घ्यावा. रत्नागिरी भारतीय जनता पार्टी व्यापारी – व्यावसायिक तसेच नागरिकांच्या भावना यांच्या पाठीशी उभी आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय करून लॉकडाऊन संदर्भात खुलासा करावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
रत्नागिरी मध्ये प्रशासन दबावाखाली काम करत आहे. समस्त जनतेचे सहकार्य अपेक्षित असते तेव्हा समन्वय बैठक घेण्याची पद्धत होती. सर्व राजकीय पक्षांची मते जाणून घेऊन प्रशासनाला काय अपेक्षित आहे हे सांगितले जाते असे. मात्र सध्याच्या शासनाच्या कारकिर्दीत सर्वांचा समन्वय, सर्वांचा सहभाग या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. निर्णय परस्पर घ्यायचे आणि तितक्याच घाई गर्दीने ते बदलायचे याचीच चढाओढ पाहावयास मिळते हे दुर्दैवी आहे. आणि यामुळेच गोंधळ अधिक वाढतो, कार्यक्षमता घटते अशी खोचक टीका ॲड.दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

*दखल न्यूज भारत.*