आळंदीतील पत्रकारांना प्राधान्याने कोविड 19 लस उपलब्ध करून देण्यात यावी – गटनेते पांडुरंग वहीले

51

आळंदी : डॉक्टर्स, नर्स, पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आळंदी आणि पंचक्रोशीतील पत्रकारांनाही कोरोना लस प्राधान्याने उपलब्ध देण्यात यावी, अशी मागणी आळंदी नगरपरिषदचे गटनेते पांडुरंग वहीले यांनी आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात गटनेते वहीले यांनी निवेदनात म्हटले आहे, “आळंदी आणि पंचक्रोशीतील प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी कोरोना संक्रमणाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे सर्व पत्रकारांना कोरोना लसीचे संरक्षण मिळणे त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर सरकारमार्फत पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलिस यांना लस देण्यात आली. आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या नागरीकांना लस देण्यात येत आहे. मात्र, पत्रकारांना कोरोना लस देण्यासंदर्भात शासकीय स्तरावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

कोरोना योद्धांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नाहीत. पत्रकारही स्वत:चा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. पत्रकार वृत्तसंकलनासाठी जातात तेव्हा अनेक लोकांच्या संपर्कात येतात. त्याचप्रमाणे त्यांना वृत्तसंकलनासाठी विविध रुग्णालयांमध्ये सुद्धा जावे लागते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा काही पत्रकारांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे सरकारने डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे पत्रकारांनाही कोरोना लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”