नियंत्रण सुटल्याने कार खडकवासला धरणात कोसळली; ३ मुलींसह आईचाही बुडून दुर्दैवी अंत.

178

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
मार्गासनी : पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पाण्यात कोसळली. मात्र, या अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुलींचा आणि आईचा बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कार चालक वडिलांना पोहता येत असल्याने त्यांचे प्राण वाचले.या मृतांमध्ये वैदेही विठ्ठल भिकुले (वय ८) प्राजक्ता विठ्ठल भिकुले (वय १९) प्रणिता विठ्ठल भिकुले( वय १५) व आई अल्पना विठ्ठल भिकुले (वय ४५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.सर्व मृत तोरणागड पायथ्याच्या विहीर (ता. वेल्हे) येथील आहेत.

हे कुटुंब कारमधून पानशेत रस्त्याने पुण्याकडे येत होते. त्यावेळी माऊलाई मंदिराजवळ धरणात कार कोसळली.

घटनेची माहिती मिळताच पानशेत पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. होमगार्ड आडके यांनी पाण्यात पडलेल्या कारचे दरवाजे तोडून तीन मुलींना मृतावस्थेत बाहेर काढले. बुडून बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले आहे. सायंकाळी उशिरा महिलेचा मृतदेह हाती लागला.