सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडीलास जन्मठेप

257

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

चिमूर:- सावत्र मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून मुलगी आणि वडिलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या नराधम बापाला आजन्म कारावासाची शिक्षा वरोरा येथील जिल्हा न्यायाधीश वर्ग-1 तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश डी.के. भेंडे यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील आझाद वॉर्डमध्ये किरायाच्या घरात राहणाऱ्या अब्दुल कलीम शेख यांची पहिली पत्नी बल्लारशाह येथे असताना त्याने चिमूर येथे एका मुलीची आई असणाऱ्या विधवा महिलेशी पुन्हा लग्न केले होते. विवाहानंतर सात वर्षांनी त्याची पत्नीचे निधन झाले. तिच्यापासून त्याला दोन मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्य झाले होते. यामुळे एक सावत्र मुलगी आणि दोन सख्ख्या मुली व एक सख्खा मुलगा अशा सर्वांना घेऊन तो राहत होता.

दरम्यान पीडित सावत्र मुलगी एकोणवीस वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न ठरवून 17 डिसेंबर 2018 रोजी साक्षगंध करण्यात आले होते. तेव्हापासून सावत्र वडील अब्दुल कलीम शेख यांची वाईट नजर पीडित सावत्र मुलीवर होती असा आरोप होता. त्यातून त्याने तिला पेट्रोल टाकून जीवे मारण्याची धमकी देऊन अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला होता.

जीवाच्या भीतीने ती आपबिती कोणालाही सांगू शकत नव्हती. तिने बाहेर हा प्रकार सांगू नये म्हणून तिला दारबंद करून घरातच ठेवले जात होते. 19 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास सावत्र बापाने पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घटनेनंतर तिची होणारी नन्दन तिला भेटायला आली असता क्रूरकर्मा नराधम सावत्र बापापासूनची सर्व आपबिती तिने तिला सांगितले. त्यानंतर दोघांनीही चिमूर पोलिस स्टेशन गाठले आणि पीडित मुलीने पवित्र नात्याला कलंकित करणाऱ्या सावत्र वडिलाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी 376 (2 ) यासह अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अब्दुल कलीम शेख याला अटक केली.चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगोले यांनी तपास पूर्ण करून 7 मे 2019 रोजी प्रकरण वरोरा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले.

न्यायालयाने पाच साक्षीदार तपासून पाहिले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद व साक्षीदारांची भयाने आणि इतर सबळ पुरावे आरोपी विरुद्ध आढळून आले यामुळे जिल्हा न्यायाधीश वर्ग-1 तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वरोरा डी.के. भेंडे यांच्या न्यायालयाने आरोपी अब्दुल कलीम शेख याला आजन्म कारावासाची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे अडव्होकेट गोविंद उराडे यांनी सरकारी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. तर कोर्ट पैरवी म्हणून कमलेश मोहमारे यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.