तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करता न ! मात्र त्या केसांची विक्री होते चीनला

284

हर्ष साखरे दखल न्युज भारत

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशचे माजी मंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) नेते अयन्ना पत्रुदु यांनी सुप्रसिद्ध तिरुपती मंदिरात भक्तांकडून दान केल्या जाणाऱ्या केसांची परदेशात तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. केसांच्या तस्करीमध्ये सत्ताधारी पक्ष वायआरएस काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप देखील अयन्ना पत्रुदु यांनी केला आहे. तिरुपती मंदिरात दान केले जाणारे केस म्यानमार, थायलंड आणि चीनला विकले जात असल्याचा आरोप टीडीपीनं केलाय.
मिझोराम-म्यानमार सीमेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांनी नुकतंच २ कोटी रुपये किमतीचे माणसांचे केस जप्त केले होते. याचाच दाखला देत टीडीपीनं सत्ताधारी पक्षावर जोरदार घणाघात केला आहे. या घटनेतून राज्य सरकारचा भांडाफोड झाल्याची टीका टीडीपीनं केली आहे. “वायएसआर काँग्रेसचे नेते रेती, सिमेंट आणि दारूसोबतच केसांचीही तस्करी करत असून यांची माफीयागँग उघडकीस आली आहे”, असं अयन्ना पत्रुदु म्हणाले.
तिरूपती मंदिरातील केस हे सुरुवातीला म्यानमारला पाठवले जातात. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ते थायलंड आणि चीनला पाठवले जातात, असा आरोप पत्रुदु यांनी केला आहे. या केसांचा उपयोग विग बनविण्यासाठी केला जातो आणि याचा व्यापार संपूर्ण जगभरात पसरला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारावर जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं स्पष्टीकरण द्यायला हवं, अशी मागणी टीडीपीनं केली आहे. केस माफिया टोळीवर अंकुश ठेवण्यात सरकार अपयशी का ठरत आहे?, असाही सवाल त्यांनी केला आहे.
“भक्तांनी दान केलेल्या केसांच्या तस्करीला मदत करुन वायआरएस काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदुंच्या भावना दुखावण्याचं काम केलं आहे. जगभरातून लाखो भाविक येथे येत असतात. देवावरील श्रद्धेपोटी ते आपले केस दान करत असतात. पण सत्ताधारी पक्षाचे नेते मंदिराच्या प्रतिमेला ठेच पोहोचविण्याचं काम करत आहेत”, असं पत्रुदु यांनी म्हटले आहे.
तिरुपती मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टनं (टीटीडी) केसांच्या तस्करीबाबतच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. तिरुपती मंदिरानं भक्तांनी दान केलेल्या केसांच्या स्टोरेज, प्रोसेसिंग, हँडलिंग आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी योग्य नियमावली व प्रणाली तयार केली आहे. यात कोणत्याही चुकीच्या कृत्याची शक्यताच नाही, असं तिरुपती मंदिर ट्रस्टचे अधिकारी एवी धर्म रेड्डी यांनी सांगितले.