२०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकांना मिळू शकतो ‘ई व्होटिंग’चा पर्याय, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची माहिती

108

हर्ष साखरे दखल न्युज भारत
भारत:- सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकांना ‘ई व्होटिंग’चा पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, अशी महत्वपूर्ण माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली. रिमोट व्होटिंग अर्थात ई व्होटिंगच्या अनुषंगाने पुढील दोन ते तीन महिन्यात पायलट प्रकल्प राबविला जाणार असल्याचेही अरोरा यांनी नमूद केले.

निवडणूक आयोगाने चालू वर्षाच्या सुरुवातीला आयआयटी मद्राससह इतर काही संस्था व तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने रिमोट व्होटिंग योजनेवर काम सुरू केले होते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित या योजनेत मतदारांना मतदानावेळी एका ठराविक ठिकाणी जमा व्हावे लागेल. ब्लॉकचेन ही एक माहिती गोळा करण्याची प्रणाली असून जी सिस्टममध्ये बदल करणे, हॅक करणे यापासून पूर्णपणे सुरक्षित आहे. ब्लॉकचेन व्यवहाराचा डिजिटल लेजर असतो. या तंत्रज्ञानात डेटा कुठेही स्टोअर होत नाही. विभिन्न विकल्पावर विचारविमर्श करून निवडणूक आयोग अशा प्रकारच्या मतदानाला अंतिम रूप देईल, असे अरोरा यांनी स्पष्ट केले.

ई व्होटिंगबाबत निर्णय घेण्याआधी विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा केली जाईल, असे सांगून अरोरा पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग आयआयटी मद्रासची मदत घेऊन एका अशा तंत्रज्ञानावर काम करीत आहे की ज्यामुळे लांब व दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या मतदारांना मतदान करणे सोपे जाईल. या लोकांना मतदान केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही व लांब राहूनही ते आपला मतदानाचा अधिकार बजावतील. ही सुविधा इंटरनेट आधारित अथवा घरी बसून मतदान करण्याची नाही. रिमोट व्होटिंगचा पर्याय लोकांना कोणत्या स्वरूपात मिळेल, या पायलट प्रकल्पाचा निकाल आणि त्याच्या रुपरेषेवर अवलंबून राहील. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर इंटरनेटच्या माध्यमातूनही मतदान शक्य होऊ शकते.