प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था व कमकुवत पुलासंदर्भात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमान्यांचा सुखकर प्रवास व्हावा, या दृष्टीने चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या कोकणातील पालकमंत्री व अधिकारी यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीत रस्त्याची डागडुजी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चिपळुणात रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. यामुळे गणेशोत्सवादरम्यान मुंबईकर चाकरमान्यांचा काही अंशी सुखकर प्रवास होण्यास मदत होईल असे बोलले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या कामाने तितकासा वेग घेतलेला नाही. यामुळे काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम झाले नाही. दरम्यान, या रस्त्यांवर सातत्याने खड्डे पडत असून वाहन चालकांना आपले वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे. तर गणेशोत्सवादरम्यान मुंबईकर चाकरमान्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रवासात विलंब होतो. तर दुसरीकडे वाशिष्ठी नदीवरील पूल धोकादायक बनला असून या पुलावरून वाहतूक बंद करावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेऊन ना.अशोक चव्हाण यांनी कोकणातील पालकमंत्री व अधिकारी यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिवसांपूर्वी बैठक घेतली. या बैठकीत गणेशोत्सवादरम्यान मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची डागडुजी करण्याचे निर्देश दिले.तसेच कमकुवत पुलासंदर्भात देखील काही सूचना केल्या. यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सदरील काम दर्जेदार व्हावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदरच या कामाला सुरुवात झाल्याने प्रशांत यादव यांच्या कार्यतत्पर भूमिकेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
दखल न्यूज भारत