देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागातील डांबरीकरण रस्त्यांची झाली दयनीय अवस्था

69

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागातील डांबरीकरण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने नागरिकांना आवागमन करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दळणवळण करण्याकरिता गावांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे डांबरीकरण रस्ता होय.ग्रामीण भागातील डांबरीकरण रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभाग व इतर विभागाद्वारे बांधकाम पूर्ण केले जातात.दरवर्षी डांबरीकरण रस्त्यांवर करोडो,लाखो रुपये खर्च केले जातात.एखाद्या कंत्राटदारांना ठेका देऊन बांधकामे पूर्ण केली जातात.मात्र अशा कामांचे मूल्यमापन योग्यरीत्या केल्या जात नसल्याने डांबरीकरण रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविले जातात.एक ते दोन वर्षातच डांबरीकरण रस्ते पूर्णपणे उखडून रस्त्यांची वाट लागली असल्याचे दिसून येते.
डांबरीकरण रस्ता तयार करतांना बी बी एम, कार्पेट, गिट्टी व इतर साहित्ये योग्य प्रमाणात वापर करीत नसल्यानेच डांबरीकरण रस्ते भकास झालेली आहेत.काही ठिकाणी पैस्याच्या हवासापोटी केवळ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर अंदाजपत्रकात तरतुद करून लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. रस्ता मजबूत वा टिकाऊ व्हावा हा उद्देश न ठेवता खिसा कसा गरम व्हावा याकडे लक्ष दिले जाते.काही ठिकाणी डांबरीकरण रस्ते केवळ नावापुरतेच तयार केली गेली आहेत.गावातुन योग्य प्रमाण मात्र गावाबाहेरून चलती का नाम गाडी अशी बिकट अवस्था झाली आहे.रस्त्यावरील गिट्टी डोके वर काढून पाहू लागते तर पायी जाणारे,सायकलस्वार, दुचाकीस्वार रस्त्याची वाट शोधत इकडून जावे की तिकडून जावे मार्गक्रमण शोधात असतात.या सर्वांकरिता जबाबदार कोण?असा सवाल उपस्थित होतो.याकडे दुर्लक्ष न करता ग्रामीण भागातील डांबरीकरण रस्ते योग्य प्रतीचे,मजबूत व टिकाऊ व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे ठरते.