चाकरमान्यांना सुखरूप कोकणात येऊ द्या: आ. भास्करशेठ जाधव एस.टी., रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याची मागणी

123

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांसह एसटी बसेस सोडाव्यात, अशी मागणी माजी मंत्री व गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. मुंबई, पुण्याहून चाकरमानी गावी आल्याशिवाय कोकणातील गणेशोत्सव हा सण साजरा होत नाही. गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे मुंबई, पुण्यामध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी अडकून पडले आहेत. या काळात त्यांना पासदेखील उपलब्ध होऊ शकले नाहीत. जे आले त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे किमान गणपती उत्सवासाठी तरी त्यांना सुखरूप गावी जाता यावे, यासाठी सरकारने व्यवस्था करावी, अशी माफक अपेक्षा कोकणवासीयांची आहे, असे आ. जाधव यांनी पत्रात म्हटले आहे. गणेशोत्सव जवळ आला असला तरी शासनाकडून कसलाही स्पष्ट निर्णय होत नसल्यामुळे चाकरमानी व कोकणवासीयांमध्ये चलबिचल सुरू आहे. वेळीच निर्णय झाला नाही तर कोकणवासीयांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणवासीय झुंडीने कोकणात यायला निघतील, परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन कोकणवासीयांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या, एस. टी. बसेस तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी भास्करशेठ जाधव यांनी पात्रातून केली आहे.

*दखल न्यूज भारत*