नवेझरी गावात २ मातासह १३ बालकांचा दुर्दैवी मृत्यु प्रशासनाची उदासीनता : शासनाची योजना ठरताहे कुचकामी

0
630

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची:-दि.१७/३/२०२१
इथून १५ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त नवेझरी गावात मागील ४ वर्षांत २ मातांसह १३ बालकांचा आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे दुर्दैवी मृत्यु झाल्याची गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती पुढे आली आहे . त्या गावात कार्यरत वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसुन माता व बाल संगोपनावर वारेमाप खर्च करणाऱ्या शासनाच्या एकुणच योजनांवर प्रश्न उपस्थीत केल्या जात आहे. माता व बाल मृत्यु रोखण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरले असुन या अतिदुर्गम गावातील माता व बाल मृत्युचे तांडव अद्याप सुरूच आहे.
आंबेखारी उपकेंद्राअंतर्गत नवेझरी येथे सन २०१४ पासून पूर्ण वेळ, पूर्ण पगार घेणारे वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु त्यांचा नवेझरी वरून ८० किमी अंतरावर असलेल्या वडसा येथे २४ तास सेवा देणारे खाजगी रुग्णालय आहे. नवेझरी गावातील माता व बाल मृत्युची तसेच कार्यरत वैद्यकिय अधिकारी यांच्या खाजगी रुग्णालयाची माहिती तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांना पूरेपूर माहिती असताना ,
या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष का होत आहे हा यक्षप्रश्न आहे.
उपचारा अभावी मृत्यु पावलेल्या मातामध्ये रेखा गणेश बोगा आणि रमीता नरेश घावडे यांचा समावेश आहे तर बाल मृत्यु मध्ये लीलाबाई लखन हिळामी यांचा बाळ व मुलगी,शेवंता चरण काटेंगे यांचा बाळ, ज्योतीबाई करण कोरचा यांचा बाळ, मृतक माता रेखा गणेश बोगा यांचा बाळ, मृतक माता सगवंती नरेश घावळे यांचा बाळ, बसंती हेमराज केरामी यांची मुलगी, चंद्रकला सुन्हेर तुलावी यांची जुळी दोन्ही मुले, समिका राजेश हलामी यांचा बाळ, दसोबाई ठाकुर उईके यांचा बाळ,कलावंती बीसन नरेटी यांचा बाळ, सुखवंती मंजूराम तोफा यांचा बाळ
वेळीच उपचार न मिळालेल्या बालकांची वय एक दिवस ते महीना भराच्या कोवळ्या बालकांचा समावेश आहे.
निरागस व कोवळ्या बालकांचे एका मागुन एक जगाचा निरोप घेत असतांना तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या बोरकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी हे, त्या गावात जणु काहीच घडले नाही, अशा आविर्भावात वागत आहेत. मुख्यालयी न राहता गावातील गरोदर माता व बालकांची नियमित आरोग्य तपासणी व औषधोपचार न केल्यानेच नवेझरी येथील तब्बल १४ माता-बालमृत्युस कारणीभुत असल्याचा ठपका गावकय्रांनी कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांच्यावर ठेवलेला आहे. त्यामुळे, आपल्या कर्तव्यात कसुर केल्याने या काम न करताच वेतनाची उचल करणाय्रा डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवेझरी येथील ग्रामसभेचे अध्यक्ष हरिश्चंद्र तुळसिराम हिळामी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या गावाला सदर प्रतिनिधी ने भेट दिली असता, मन सुन्न करणारी हृदयद्रावक विदारक वास्तविक घटना समोर आली. नवेझरी हे जवळ पास १५० लोकवस्ती असलेले एक खेडेगाव.हे गाव तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असून या गावाच्या आसपास मयालघाट, मुरकुटी, बोंडे, पड्यालजोब, आंबेखारी, फुलगोंदी असे लहान लहान खेडी आहेत. गाव जंगलात आहेत, त्यामुळे साहजिकच तेथे १००% लोक आदिवासी, अशिक्षित, गरीब राहतात. या लोकांकडे सुरूवातीपासूनच शासनाचा दुर्लक्ष राहीला आहे. येथील रूढी परंपरा आजही अबाधित राहिले आहेत. त्यामुळे,तेथील लोक पारंपरिक औषधीवर अवलंबून असतात.
अशा प्रकारच्या आदिवासी जिल्ह्यात, आदिवासी भागात नवसंजीवनी योजनेअंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देण अनिवार्य आहे. विषेश म्हणजे, या सेवे दरम्यान ते बाह्य रूग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदान माता, व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करतात. यासाठीच त्यांची नियुक्ती असते.
त्यानुसार आंबेखारी आरोग्य उपकेंद्र स्थापन करून या केंद्रा अंतर्गत सात गावातील लोकांना आरोग्य सेवा पुरविली जाते. या केंद्रात आरोग्य वर्धीनी योजनेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती लेमदेव हर्षे या यांची नियुक्ती असून त्यांना आजपर्यंत कुणीही पाहीले नाही,असे आंबेखारी येथील प्रतिष्ठीत नागरीक कुमारसाय गोटा सांगतात. आंबेखारी आरोग्य उपकेंद्र नवेझरी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. विद्या कुसन बोरकर यांची नियुक्ती असून ते दि. ४/४/२०१५ पासून आजपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अभिलेखात सतत कार्यरत असून नियमित पगार उचलत आहेत. मात्र नियुक्ती ठिकाणी कधीही आलेच नसल्याचे गांवकरी सांगतात.
वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या बोरकर यांचे पती डॉ. चंद्रकांत यादवराव नाकाडे यांची सुद्धा याच तालुक्यातील बेलगाव (घाट) आरोग्य उपकेंद्र अंतर्गत कोहका येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून
दि. ४/४/२०१५ पासून नियुक्ती आहे. यांच्याबाबत बेलगाव चे उपसरपंच अशोक गावतूरे यांना विचारले असता ते म्हणाले, २०१५ पासून आजपर्यंत मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ चंद्रकांत नाकाडे हे असल्याची माहिती आहे,पण हे पल्सपोलीओ व्यतिरिक्त उपकेंद्रातील गावामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालकांची तपासणी केल्याचे कधीही आढळून आले नाही. तसेच आपत्ती व्यवस्थापन कोविद-१९ मध्ये कधीही गावात उपस्थित झाले नसल्याचे सांगीतले.
उपरोक्त मानसेवी डॉक्टर दाम्पत्य हे वडसा तालुक्यातील विसोरा येथील रहिवासी असून तेथे आणि वडसा येथे २४ तास सेवा उपलब्ध असलेला खाजगी दवाखाना आहे. जर हे दाम्पत्य वडसा येथे २४ तास सेवा देतात तर आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी केव्हा सेवा देतात? असा सवाल उभा ठाकला असला तरी ह्या सगळ्या गोष्टीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. तरीही कार्यवाही का केल्या जात नाही हा प्रश्न कोरची वासीयांना सतावतआहे. माता-बालकांच्या दुर्दैवी मृत्यु ला कारणीभूत असणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरित आहे.
***********************
*कोरची तालुक्यातील बोटेकसा व कोडगूल या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात लक्ष्य देवुन काम करावे लागते त्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या बैठकीत जावे लागले मी कुठे कुठे लक्ष देत राहणार आहे मी काही शक्तीमान नाही आहे सर्वा कडे लक्ष देण्यासाठी*

डॉ विनोद मडावी तालूका वैद्यकीय अधिकारी कोरची

2014 ते आजपर्यंत माणसेवी डॉक्टर म्हणून चंद्रकांत नाकाडे हे असल्याची माहिती मिळाली पण हे पल्स पोलिओ व्यतिरिक्त उपकेंद्रातील गावांमध्ये माता व बालकांचे कुपोषण तपासणी केली कधीच आढळून आले नाही तसेच आपत्ती व्यवस्थापन covid-19 मध्ये कधीही उपकेंद्रातील गावात भेट दिली नाही त्यामुळे शासनाकडून मिळणारा पगार आंधळं दळतं कुत्र पिठ खातं अशी स्थिती आहे याची विभागीय चौकशी करण्यात यावी
अशोक गावतुरे शिवसेना नेते तथा उपसरपंच बेळगाव घाट