देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन मजूर बोनस मिळण्याच्या आशेवर -वनखात्याचे दुर्लक्ष,मजूर चिंताग्रस्त

0
82

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन मजूर दीड वर्ष लोटूनही बोनस मिळण्याच्या आशेवरच असल्याने मजुरांनी वनविभागाप्रति नाराजी व्यक्त केली आहे.
विविध तालुक्यात पेसा व नॉन पेसा अंतर्गत वित्तीय वर्ष २०१८-१९ मध्ये गावोगावी मजुरांच्या मार्फतीने तेंदूपत्ता संकलन करण्यात आले.तेंदूपत्ता संकलन ठराविक मजुरीच्या दराने सर्वांना वितरित करण्यात आले.संकलनाची मजुरी देण्यात आली मात्र जाहीर करण्यात आलेला बोनस अजूनही मिळाला नसल्याने तेंदूपत्ता संकलन मजूर वर्ग कमालीचा नाराज झाला आहे.
काही कालावधीनंतर तेंदूपत्ता संकलन करण्याला सुरुवात करण्यात येणार असून मागील बोनस मिळणार की नाही?याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.तेंदूपत्ता संकलन मजुर जंगलातील काट्या-गोठ्यातुन पायवाट शोधत तेंदूपत्ता गोळा करीत असतात.मात्र या मजुरांचा वनखात्याअंतर्गत जराही विचार केला जात नाही.सकाळपासून सायंकाळपर्यंत एक-एक पानाचे पत्ते लावून मुडके तयार करून घेतात.पैस्याची बाब आली की सर्वचजण हात वर करून घेतात.
जोपर्यंत मागील तेंदूपत्ता बोनस मिळणार नाही तोपर्यंत तेंदूपत्ता तोडण्यात येऊ नये.यासाठी वनविभागाने जातीने लक्ष घालून मजुरांची तेंदूपत्ता बोनस लवकर जमा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.