Home महाराष्ट्र काय चाललेय हे ? उद्या आरोग्य यंत्रणेने अंग काढले तर काय करायचे...

काय चाललेय हे ? उद्या आरोग्य यंत्रणेने अंग काढले तर काय करायचे ?

296

 

रत्नागिरीत गंभीर घटना घडत आहेत.दोन दिवसापूर्वी संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्याने अतिदक्षता विभागात झुंडशाही झाली.मध्यंतरात एक करोना बाधित अंतिम संस्कारासाठी घरी नेण्यात आला.रात्री सव्वा दोनला त्या देहावर अंत्यसंस्कार झाले.आता आता तर कोरोना बाधित आणायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर आणि बोलविलेल्या पोलिसांवर हल्ले होत आहेत.ही लाजिरवाणी तितकीच संतापकारक बाब आहे.जिल्हा प्रशासन ठप्प आहे.प्रश्न भावनिकतेचा नाही.कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे.त्याचे विषयीचे प्रबोधन हरएकप्रकारे होतेय.जे चाललेय त्याचा निरपराध लोकांवर प्रादुर्भाव होण्याचा प्रकार झाला तर ती बाब कोण निस्तरणार ?
कुणीही हाकाटी पिटली.तरी जिल्हा रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय अधिकारी,परिचारीका,वॉर्डबॉय,सफाई कामगार हे मनुष्यबळ फार कमी आहे.ही वस्तुस्थिती झाकून उपयोगी नाही.कोरोना आला म्हणून नव्हे गेली दहा वर्षे हे चाललेले आहे.तरीही त्याकडे दुर्लक्ष करायचे.आणि आरोग्य कर्मचारी कमी,सुविधांचा अभाव म्हणून ओरडायचे.हे सुरू आहे.
ज्यांना सिव्हिलशी संपर्क आहे त्यांना माहित आहे.जीवाची बाजी लावून उपलब्ध कर्मचारी काम करीत आहेत.
कोरोना योद्धे आपले तुणतुणे वाजवत आहेत
पण प्रत्यक्षात कोरोना रुग्णांचा एकही नातेवाईक फिरकत नसताना कोरोना रुग्णांच्या थरथरणा-या हातांना येथील परिचारीका दोन घास भरवत आहेत.मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारला वॉर्डबॉय धावत आहेत.परवा एका युवा परिचारीकेला कोरोना लागण झाली.या परिचारीकांना मागील चार महिने पगार नाही.लांबून रहाणा-या या परिचारीकांचे दैन्य कुणाला दिसले का ?
*कोणता कोरोना योद्धा या प्रसंगात उभा आहे सांगा.*
आता कहर झालाय राजरोस शासकीय रुग्णालयात घूसून तेथील परिचारीका, वैद्यकीय अधिकारी यांना दटावण्याचे प्रयत्न होताएत.तिथे ठेकेदारीवर नेमलेले सुरक्षा रक्षकही आपल्या जीवाच्या भीतीने दूर होतात.ही वस्तुस्थिती आहे.जिल्हा पोलिस प्रमुख आपली प्रकृती सावरुन हजर झाले आहेत. या स्थितीत त्यांना त्रास देणे योग्य नाही. मागे संशयित कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी इलेक्ट्रिक ट्युब तेथील कर्मचाऱ्यांवर उभारली.काय चाललेय हे ? निसर्ग संकटात आपण सहाय्य करायचे जे सेवाभावाने काम करतायत त्यांचे कौतुक करायचे की त्यांच्या अंगावर धावायचे ? रत्नागिरीत कोरोनाचा वेग प्रचंड पसरलाय.रुग्णांना ठेवायला जागा कमी पडतेय.नवीन महिला रुग्णालयाचा वापर सुरु करतायेत तिथे आवश्यक कर्मचाऱ्यांची सोय लावली काय ? येतोय तो आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढतोय.संवेदना संपल्या आहेत.एकूण प्रकारावरुन माणुसकी संपलीय असे दिसतेय.आश्चर्य म्हणजे जिल्हा प्रशासन कुठे आहे ? जिल्हाधिकारी यांनी या रुग्णालयासह जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांना कितीदा भेट दिली ? तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक बोल्डे यांनी अॉक्सिजन विषयक निविदा पुण्याच्या ठेकेदाराला दिली.मागील आठवड्यात यामध्ये बिघाड झाला.पुण्याच्या ठेकेदारांने मागे हात घेतले.शेवटी कोणीतरी रत्नागिरीतील तज्ञ धावला.कोरोना रुग्ण असताना त्याने माणुसकी धर्म दाखवला.
खरा कोरोना योद्धा तो आहे.त्याला वंदन झालेच पाहिजे.
रविवारी रात्री कहर झाला. जमाव अतिदक्षता विभागात घुसला.मृतदेह घेऊन निघून गेला.सुरक्षित आरोग्यदायी निर्दोष व्यक्तींच्या जीविताशी हा खेळ आहे.यावर निर्बंध नाहीत का ? न्याय मागणा-यांना पोलिस दटावतात.वाहतूक व्यवस्थेत दंड आकारुन कंबरडे मोडतात.ही कसली न्याय व्यवस्था ? जीवाचा आकांत सोसत आरोग्य यंत्रणेशी चाललेली ही मुजोरी कोण संपवणार ? नाहीतरी सर्व आलबेल आहे.मनमानी सुरु आहे.संचारबंदीचे धिंडवडे सुरु आहेत.लोकप्रतिनिधी अपयश झाकत आहेत.पालकमंत्री गायब आहेत.विद्युत शववाहीनीचे काय झाले ? प्रश्न विचारायचे नाहीत काही बोलायचे नाही.आरोग्य यंत्रणा विषयी कमतरता मांडली तरी चौकशीसाठी पत्रकार पोलिस स्थानकात बसवला जातो.
अरे ही काय अघोषीत आणिबाणी आहे काय ?
मी तर कोणत्याही विषयावर बोलायचे नाही ठरवलेय पण रहावत नाही.माणूस म्हणून हे बघवत नाही.ज्या यंत्रणेने बोलायचे ती यंत्रणा मांडलीक झाली आहे.इथे दडपशाही चाललीय.हे लिहितांना परिणामांची कल्पना मला आहे.कोरोना लढाई व्हायलाच हवी.अनेक त्रुटी निदर्शनास येतात पण त्यावर बोलायची ही वेळ नाही.म्हणून खूप थांबलो.जे चाललेय ते घातक आहे.कायदा सुव्यवस्था आम्हांला हवीय.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.जे चाललेय ते योग्य नाही.सद्या इतकेच !
लेखन : बाबा ढोल्ये

Previous articleऑनलाईन बकरे खेरदी विक्री जिल्ह्यातील विविध ठिकाणी बकरे खेरदी विक्री करण्याची परवानगी द्या:- शिवबुध्दचे संदिप मुटकुळे
Next articleमहात्मा गांधी महाविद्यालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ‘मी आय. ए. एस. होणारच’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न