यवतमाळ कोरोना अपडेट, जिल्ह्यात एकाच दिवशी 68 पॉझेटिव्ह रुग्णांची भर, पांढरकवडा येथील 42 जणांचा समावेश ; सहा जणांना डिस्चार्ज

228

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

जिल्ह्यात सुरवातीला एकेरी अंकात वाढणारा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा गत काही दिवसांपासून रोज दुहेरी अंकात वाढत आहे. आज सोमवारी जिल्ह्यात तब्बल 68 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडल्याने चिंतेत भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले सहा जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
सोमवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 68 जणांमध्ये 40 पुरुष व 28 महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा येथील 24 पुरुष व 18 महिला, यवतमाळ शहरातील संजय गांधी नगर भोसा रोड येथील एक महिला, यवतमाळ शहरातील रोहिदास नगर येथील एक पुरुष तसेच यवतमाळातील तीन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील चार पुरुष व तीन महिला, नेर शहरातील नवीन नगरी येथील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील तीन पुरुष, कळंब तालुक्यातील जोडमोहा येथील एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, महागाव येथील एक पुरुष, आर्णि शहरातील ग्रीन पार्क येथील एक पुरुष व आर्णि येथील एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात रविवारपर्यंत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 238 होती. यात आज (दि.27) तब्बल 68 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 306 वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या सहा जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 300 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 268 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 32 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 812 झाली आहे. यापैकी 486 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 26 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 64 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 13407 नमुने पाठविले असून यापैकी 12078 प्राप्त तर 1320 अप्राप्त आहेत. तसेच 11266 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.