धानोरा तालुक्यात चित्ररथाने पिक विमा बाबत जनजागृती पंचायत समिती सभापती अनुसयाबाई कोरेटी यांनी दाखवली हिरवी झेंडी….

0
98

 

धानोरा/भाविकदास करमनकर

यावर्षी खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पिक विमा योजना राबविली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोरा च्या वतीने जनजागृती वाहन गावागावात फिरविले जात आहे. या जनजागृती वाहनाला तहसील कार्यालयाच्या प्रांगणामधून पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अनुसयाबाई कोरेटी यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती करण्यासाठी व तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना जुलै अखेर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पिकांना विम्याचे संरक्षण द्यावे, असे आव्हान सभापती कोरेटी यांनी केले.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारखा आपत्तीपासून प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थिती शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी पिक विमा योजना राबविली जात आहे. पंतप्रधान पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा असे आवाहन करण्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. सध्या चित्ररथाद्वारे ध्वनिक्षेपकावरून शेतकऱ्यांना जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहे.
पिक विमा बाबत जागृती प्रारंभ धानोरा येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणामधून पंचायत समितीच्या सभापती अनुसया ताई कोरेटी यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बि वाय निमसरकार, तहसिलदार महेंद्र गणवीर, नायब तहसीलदार डी आर भगत, नायब तहसीलदार डी एम वाकुडकर, नायब तहसीलदार माधुरी हनुमंते, तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, कृषी अधिकारी शिवाजी खटके, कृषी पर्यवेक्षक निलकंठ बडवाईक आणि विमा योजनेचे तालुका प्रतिनिधी संतोष नायगमकर हे उपस्थित होते