आगरी समाजातील साहित्यिक आता समोर येत आहे – अरुण म्हात्रे “साहित्य एक प्रतिभाशक्ती” पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

0
284

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

भिवंडी (ठाणे), दि. १६ : गोवे गावचे सुपुत्र तसेच साहित्यिक हृदयनाथ पाटील यांच्या “साहित्य एक प्रतिभाशक्ती” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भिवंडीतील गोवे गावात माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून स्वयंभू श्री गणेश मंदिर परिसरात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गावातील पहिल्या एम. बी. बी. एस. पदवी संपादन करुन सध्या एम. डी करत असणाऱ्या डॉ. अंकिता विश्वनाथ पाटील व पहिली पी. एच. डी. व्यक्ती डॉ. शत्रुघ्न बबन पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, साहित्यिक भि. ना. बारस्कर, उद्योजक भगवानशेठ भोईर, टेमघर पाडा शाळेचे प्राचार्य हरिश्चंद्र चौधरी, समाजसेवक गिरीश म्हात्रे, मुंबई महापालिका कनिष्ठ पर्यवेक्षक धैर्यधर पाटील व शिवदत्त कोठेकर हे उपस्थित होते.

दरवर्षी गोवे गावात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने गावातील उच्च शिक्षित तरुण पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी विशेष सत्कार करण्यात येतो. त्यांनी अथक परिश्रम घेऊन संपादन केलेल्या ज्ञानाचे कौतुक केले जाते. मोठ्या बॅनरवर गावभर त्यांची प्रसिध्दी केली जाते. नवीन तरुण पिढीला आपणही असे काही तरी उल्लेखनीय कार्य करावे असे वाटते.

शारीरिक शिक्षण विभाग क्र. १७ च्या वतीने मुलुंड ‘टी’ विभागातुन सेवानिवृत्त झालेल्या शारीरिक शिक्षण शिक्षक व उत्कृष्ट लेखक हृदयनाथ पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. टेमघरपाडा शाळेचे प्राचार्य हरिश्चंद्र चौधरी यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी आपल्या मनोगतातुन हृदयनाथचे अनेक चांगले पैलू उपस्थितांसमोर उघड केले. सविता पाटील यांनी दमदार मनोगत व्यक्त केले. हृदयनाथ पाटील यांनी सांगितले की, माझ्या पत्नीच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मी पुस्तक लिहु शकलो. साहित्यिक भि. ना. बारस्कर यांनी पुस्तक काढण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

शिवदत्त कोठेकर यांनी “आगरी समाजाचे आदरातिथ्य” याविषयावर पुढील पुस्तकात लिहावे असे लेखक हृदयनाथ यांना विनंती केली. अशोक नायगावकर यांनी दोन कविता ऐकवुन उपस्थितांची मने जिंकली. अरुण म्हात्रे यांनी ” ते तुझे गीत गाण्यासाठी” हे गीत सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. हृदयनाथ व त्यांच्या पत्नी सविता या दांपत्याने एकेक पुस्तक लिहुन प्रकाशन सोहळ्याला आम्हाला बोलवावे. तसेच पुढील वर्षी साहित्य संमेलन गोवे गावात ठेवण्यासाठी नियोजन करावे, मी पुर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ पाटील यांनी केले. सुत्रसंचालन रामचंद्र भालेराव यांनी तर शेवटी सर्वांचे आभार प्रशांत पाटील यांनी मानले.