बोलणारा नव्हे, करुन दाखवणारा नेता ‘पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे’

143

 

दखल न्युज भारत’

©️-पंडित मोहिते-पाटील ✍️
(पत्रकार – लेखक)
दि.: २७/०७/२०२०

शिवसेनेचे मुखपत्र दै.’सामना’चे विश्वस्त म्हणून सुरुवातीला काम पाहत असताना उध्दव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे नियोजन यशस्वीपणे केले. आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांची चर्चा सुरू झाली. उध्दवजींनी महाराष्ट्रातील गडकिल्यांच्या काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरल्यानंतर त्यांच्यातील वेगळ्या कलागुणांची जाणीव सर्व जगाला झाली. आज ते एक जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. उध्दव ठाकरे एक उत्तम चित्रकारही आहेत. स्वतः कलावंत असलेल्या उध्दवजींना कलाकारांबद्दल, शेतकरी बांधवांबद्दल तसेच वारक-यांबद्दलही जिव्हाळा आणि आपुलकी आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्यांबद्दल तसेच वन्य प्राण्यांबद्दलही उध्दवजींना प्रेम आहे, हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याच तत्वानुसार उध्दवजींची वाटचाल सुरू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून दिलेल्या उध्दव ठाकरे यांची नंतर महाबळेश्वर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या शिबिरात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख या पदावर एकमताने निवड झाली. जयजयकार आणि टाळ्यांच्या गजरात उध्दवजींच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याआधी शिवसेनेत शिवसेनाप्रमुख हे सर्वश्रेष्ठ नेते आणि त्यानंतर अन्य शिवसेना नेते अशी रचना होती. २००३ मध्ये यात प्रथमच बदल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून प्रथमच कार्यकारी प्रमुख हे पद निर्माण करण्यात आले. ही शिवसेनेच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना होती.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या योध्दयाने ४० वर्षे शिवसेना नावाचा यज्ञ चेतवला. मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस एक केला होता. शिवसेनाप्रमुखांनी ज्याच्या हाती शिवसेनेची सूत्रे दिली. तो शिवसेनेचा कार्यकारी प्रमुख म्हणजेच उध्दव ठाकरे हे तितकेच यशस्वी ठरले आहेत. हे अलिकडच्या काळातील अनेक निवडणुकांनी सिध्द केले आहे. जिद्दी आणि खंबीर नेते असलेल्या उध्दवजींच्या तडफदार नेतृत्वाखाली शिवसेनेची नवी जडणघडण झाली आहे. उध्दवजींच्या नेतृत्वाखाली मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकांत शिवसेनेने दमदार कामगिरी केली. या सर्व ठिकाणी फडकलेला भगवा म्हणजेच उध्दव ठाकरे यांच्या कर्तबगारीच्या निशाण्या आहेत.
उध्दवजींना मुंबईकरांसाठी मनापासून काहीतरी करावयाचे होते. त्यांनी ‘मी मुंबईकर’ ही चळवळ हाती घेतली. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ‘मी मुंबईकर’ या मोहिमे अंतर्गत मेळावा घेण्यात आला. मुंबई नगरी फक्त श्रीमंतासाठी नाही, तर गरीब आणि मध्यमवगीॅयांसाठी सुध्दा आहे. त्यात जातपात आणि धर्म वगैरे न मानता सर्वांना नागरी सुविधा मिळायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका उध्दवजींनी घेतली. उध्दव ठाकरे यांच्या दमदार पावलांचे मराठी मनालाही कौतुक आहे आणि त्यांच्याविषयी आकर्षणही आहे. ही पावले आता महाराष्ट्राला भाग्योदयकडे नेणार हे आता अटळ भविष्य आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या वाट्याला नाकतेॅ आले होते. त्यांनी हा सुजलाम सुफलाम प्रदेश इतका ओसाड केला होता की, ज्याच्या घामाने येथे धान्याचे मोती पिकतात. तो बळीराजा शेतकरीही पार खचला होता, त्याच्या आत्मघाताने महाराष्ट्राच्या नावाला काळिमा फासला गेला. रयतेच्या, शेतकर्‍यांच्या दाणा-पिकाची काळजी घेणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रदेशात हे अक्रित घडावे, याची राज्यकरत्यांना खंतही नाही आणि खेदही नाही. त्यामुळे महाराष्ट्र जुलमी कारभाराने त्रस्त झालेला होता, जनतेत असंतोष खदखदतो होता. हे काळे चित्र बदलण्यासाठी जनता शिवसेनेकडे आणि उध्दवजींच्या नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहते आहे.
२००७ साली उध्दव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचे सारे लगाम आले तरी त्यांची घोडदौड खरे तर त्याआधी दहा वर्षांपूर्वीच सुरु झाली होती. दरम्यानच्या काळात बऱ्याच उलथापालथी घडून गेल्या. संकटे कधी कधी एकटी दुकटी येत नाहीत, पण अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यांचा धैर्याने मुकाबला करुन ती यशस्वीपणे परतवून लावणारा खरा योध्दा असतो. उध्दव ठाकरे हे असेच योध्दे आहेत. उध्दव ठाकरे हे एक प्रगल्भ आणि चतुर राजकारणी आहेत. कुणाला कधी अंगावर घ्यायचे याचे पक्के आडाखे मनात तयार ठेवूनचं त्यांची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये असते. उध्दवजी काहिसे अबोल आहेत, मात्र ते स्पष्टवक्ते आहेत. भल्याभल्यांना त्यांनी एखाद्या नामांकित पैलवानाच्या थाटात धोबीपछाड लावून तोंडावर आपटत मी बोलणारा नव्हे, तर करुन दाखवणारा आहे, याची प्रचिती आणून दिली आहे. कट्टर मावळ्यांची साथ घेऊन उध्दवजींची पुढची वाटचाल सुरू झालेली आहे. शिवसेनाप्रमुखांचे आशिर्वाद, महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम आणि पक्षासाठी छातीचा कोट करुन लढणाऱ्या शिवसैनिकांचे बळ या शिदोरीच्या जोरावर उध्दवजींची पुढील वाटचाल सतत यशाच्याच मार्गावर होईल, यात शंका नाही.