गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात यावे… आरमोरी नगरपरिषदेचे युवा नेतृत्व नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांची मागणी…

191

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

गडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने करावयाचा असेल तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे बहुजन कल्याण मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा आरमोरी नगरपंचायत चे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे. ही मागणी केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची नसून समस्त जिल्हा वासीयांची असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे खोब्रागडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.

आरमोरी नगरपरिषदेचे धडाडीचे युवा नेतृत्व नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा ना. विजय वडेट्टीवार यांची कर्मभूमी आहे. त्याची राजकीय जडणघडण या जिल्ह्यातूनच झाली त्यांना जिल्ह्यातील वास्तवीकतेची जाण आहे. जिल्ह्याचा विकास घडून यावा याबाबत त्यांची तळमळ त्यांच्या निस्वार्थ कार्यातुन दिसुन येत आहे. निसर्गाने गडचिरोली जिल्ह्याला भरभरून दिले आहे. परंतु येथील उपलब्ध साधन संपत्तीवर आधारित उद्योग निर्माण न झाल्याने जिल्हा उद्योग विरहीत व मागासलेला आहे. जिल्ह्याचा विकास घडवून आणायचा असेल धडाडीचे निर्णय घेणारा व जिल्ह्यातील समस्या शासणाच्या दरबारी लावून धरणार्‍या नेत्याची गरज असून ही क्षमता नामदार वडेट्टीवार यांच्यामध्ये आहे. असेही युवा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नामदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली तर गडचिरोलीचे पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले. मात्र कोरोनाच्या संकटात काही काळासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आले होते. ही जबाबदारी पार पाडत असतांना त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा बाबत कोणताही दुजाभाव केला नाही. याउलट मागील तीन चार महिन्याच्या कालावधीत नामदार वडेट्टीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे.

नामदार वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीचे पालकत्व सोपविण्यात आल्या नंतर त्यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. आणि त्यांची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. त्यांनी अल्पावधीतच गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतले आहे. गोंडवाना विद्यापीठासाठी सेमाना मार्गावर जागा मिळविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खत कमी पडू नये म्हणून आधीच उपाययोजना केलेली आहे. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत 19% लागू करण्यासाठी शासनाकडे जोर लावला आहे. यामुळे शासनाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळावा म्हणून ओबीसी कल्याण मंत्रालयामार्फत ‘महाज्योती’ नावाने स्वायत्त संस्था कार्यान्वित करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

गडचिरोली हा जिल्हा अतिदुर्गम व उद्योग विरहीत असल्याने अतिदुर्गम भागात रस्ते पुलांसाठी दरवर्षी कोटींचा निधी मंजूर करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नामदार वडेट्टीवार यांना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची तळमळ असून त्यांनी चंद्रपूर बरोबरच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर नामदार विजय वडेट्टीवार यांच्याकडेच गडचिरोलीचे पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा आरमोरी नगरपरिषद चे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.