पुण्यातील स्वयंसेवी संस्था कोकणवासियांच्या मदतीला

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

रत्नागिरी, रायगडमधील 1013 कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप
आर्ट ऑफ लिव्हिंग, महाएनजीओ, दशानेमा गुजराथी परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील 1013 कुटुंबांना आर्ट ऑफ लिव्हिंग (पुणे), महाएनजीओ आणि दशानेमा गुजराथी परिवाराने मदतीचा हात दिला आहे. या सर्व कुटुंबांना अन्न धान्य किट, कपडे, अर्सेनिक 30 व आयुष काढ्याचे वाटप केले.
कोकणात 3 जुलैला आलेल्या निसर्ग चक्री वादळामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली. सुपारी, काजू, नारळा-पोफळीच्या बागासह शेतीचे मोठे नुकसान झाले. घरावरील छपरे उडाली, अन्नधान्य, कपडे पावसात भिजली. वीज खांब कोसळल्याने हजारो गावातील वीज पुरवठा खंडित झाला. आधीच कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवसाय बंद असल्याने शेतकरी व सामान्यांना जगणे कठीण झाले होते. निसर्ग चक्रीवादळ व पावसामुळे संकटात आणखी भर पडली. या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना असलेली तत्काळ मदतीची गरज ओळखून पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग, महाएनजिओ आणि दशानेमा गुजराथी परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी मदत साहित्य घेऊन रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील वाड्या व वस्त्यांवर धाव घेतली. आपली सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी 1013 कुटुंबांना अन्नधान्य किटचे वितरण केले. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीचा आयुष काढा, अर्सेनिक 30 औषध तसेच मेणबत्यांचाही समावेश होता.
दि 1 जुलै रोजी रायगडजवळील हिरकनी, धनगरवाडी भागात जाऊन अन्नधान्य किट व घरगुती वापराच्या वस्तु वाटप केल्या, अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे पुण्यातील पराग गुजराथी, सुनील पोद्दार, महाएनजिओचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी दिली. तर दि 13 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधील आंबवड़े, शेनाल, खुर्दे, चिंचघर या छोट्या-छोट्या वाड्यांमध्ये पराग गुजराथी, दादा पाटील, राकेश बाफना व प्रकाश पवार गेले. याठिकाणी त्यांनी आपल्या स्वयंसेवकामार्फत धान्य किट व मेणबत्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या. संकटकाळात पुणे शहरातून मदत मिळाल्याने कोकणवासीयांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती पराग गुजराथी यांनी दिली.

*दखल न्यूज भारत*