Home मुंबई ताण तणावाशिवाय जीवन नाही – योगतज्ज्ञ रेणू निशाणे

ताण तणावाशिवाय जीवन नाही – योगतज्ज्ञ रेणू निशाणे

760

 

दिलीप अहिनवे
मुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत ‘

मुंबई, दि. २५ : बृहन्मुंबई महानगरपालिका शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या वतीने दररोज सकाळी ८ ते ९.१५ दरम्यान मोफत आॅनलाईन योग प्रशिक्षण सुरु आहे. पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्राचार्य रवींद्र परदेशी यांच्या नियोजनानुसार योगतज्ज्ञ रेणू निशाणे व जयंत निशाणे मार्गदर्शन करत आहेत.

“ताण तणाव विरहित जीवन” या विषयावर रेणू निशाणे यांनी दीड तासाचे उत्कृष्ट व्याख्यान दिले. ताण हा व्यक्तिमत्त्व विकासाचा एक अविभाज्य भाग आहे. ताणाशिवाय जीवन नाही. दैनंदिन जीवनातील कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी ताण घ्यावा लागतो. कामावर जायचे आहे त्यासाठी रिक्षा, बस, रेल्वे वेळेत पकडणे. बायोमेट्रिक उपस्थिती वेळेत नोंदवणे यासाठी ताण आवश्यक आहे. दररोज मनात ठरवलेली कामे शंभर टक्के पुर्ण होतीलच असे नाही. परंतु दैनंदिन नियोजन करावे लागते. ताण घ्यावा लागतो. वाघाची शिकार करण्याची तयारी ठेवली तर सशाची शिकार तरी किमान मिळु शकते असेही उदाहरण दिले.

ताण कमी व जास्त अवधीचा असतो. कमी अवधीच्या ताणाचा परिणाम मेंदुच्या पुढील भागात होतो. जास्त अवधीचा ताण घातक असतो. काहीजण दैनंदिन कामे व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ताण घेतात. काही लोक कामे टाळण्यासाठी विविध कारणे पुढे करण्यासाठी ताण घेतात. सकारात्मक ताण घेणे आवश्यक असते. माणुस चोवीस तासात अंदाजे २१६०० वेळा श्वास घेतो व सोडतो. श्वासाचे नियोजन करावे. श्वास सांभाळुन वापरावा. सतत राग येणारी माणसे भ्रमिष्ट होतात.

रात्री झोप येत नसेल तर झोप येण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करावा. ९५ टक्के आजार ताणामुळे होतात. काही व्याधींवर नियंत्रण करता येते तर काही व्याधी नियंत्रित करता येत नाही. हल्लीच्या काळात संसर्ग सोडला तर असा एकही आजार नाही की जो ताणामुळे झालेला नाही. योग, प्राणायाम व मुद्रांद्वारे नियमित योगाभ्यास करुन शारीरिक अवयव व अंतर्स्त्रावी ग्रंथींचे स्त्राव संतुलित होतात. जे झाले आहे त्यात मी काही बदल करु शकत नाही. अशी मनाची तयारी करुन योग्य ते नियोजन करावे. मी परिस्थिती बदलु शकत नाही, परंतु अनुकुल करुन घ्यावी. योगामध्ये हेच शिकायचे असते. भावनिक ताण असेल तर निर्णयक्षमता कमी होते. व्यवहाराचे ताण असेल तर बोटे मोजणे, नखे कुरतडणे, दात कोरणे, डोके खाजवणे व भूक लागणे ही लक्षणे दिसू लागतात. ९५ टक्के आजार ताणामुळे होतात. ताणाचे मापन करता येते. ३०० पेक्षा जास्त ताण असेल तर गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. १५० ते २९९ असेल तर उपचार होऊ शकतो. योगोपचाराने माणूस बरा होतो. परंतु स्वत:ला देखील प्रयत्न करावे लागतात. १ ते १४९ पर्यंतचा ताण सर्वांना असु शकतो.

योगनिद्रा व ध्यान-धारणेचा अभ्यास नियमित केल्याने ताण तणाव व आजारातुन माणुस बरा होतो. तुमचे स्वत:चे देखील प्रयत्न असावे लागतात. तुम्हाला कोणी विचारले कि, “तुम्ही जाणीवपूर्वक चूका करता का ?” तर उत्तर नाही असे देता. त्याचप्रमाणे इतरांकडुनही जाणीवपूर्वक चूका होत नाहीत हा सकारात्मक विचार पक्का केला की बराच ताण कमी होतो. नेहमी समझोता करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

ताण कमी करण्यासाठी खुप वेळ आंघोळ करावी. एखादे चांगले गाणे गुणगुणावे. दैनंदिनीमध्ये ताण वाढवणाऱ्या घटनेची नोंद करुन ती घटना अधोरेखीत करावी. कुत्रा, मांजर इ. पाळीव प्राणी पाळावे. मालीश करुन घ्यावी. ताण तणाव न वाढवणारी आवडीची पुस्तके वाचावी. कॉमेडी मालिका वा सिनेमा बघावा. या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत घडतात मग माझ्या बाबतीत घडल्या तर काय झाले ? असा सकारात्मक विचार करावा. मोठमोठ्याने हसावे. मानसिक दृष्ट्या सक्षम होणे या गोष्टींमुळे तणाव कमी होतो.

योग म्हणजे जोडणे. योगासने केल्यामुळे ताण दुर करता येतो. “तंत्रशुद्ध काम म्हणजे योग”. मन भाजीत टाकले की भाजी चांगली होते. तात्पर्य कुठलेही काम करताना कृतीला मनाशी जोडुन केले तर ते कौशल्यपूर्ण होते. दररोज एक तास योग करुन फायदा नाही तर “योग” ही जीवनशैली म्हणून अंगीकारायला हवी. अंतरंग योगात जाऊन ताण विरहित जीवन जगता येते. दिवसातुन एकदा तरी स्वत:शी संवाद साधा, दिवसभरात काय काय केले ते आठवा, या स्वामी विवेकानंदांच्या एका महत्त्वपूर्ण वाक्याची रेणू निशाणे यांनी आठवण करुन दिली. जयंत निशाणे यांनी सांगितले की, ताण तणावाला नियंत्रित करण्यासाठी श्वासाची गती नियंत्रित करायला हवी, तर तणावावर विजय मिळवु शकतो. प्राणायाम, मुद्रा व योगासनांच्या यथाशक्ति व नियमित अभ्यासाने हे शक्य होते.

आॅनलाईन व्याख्यानासाठी मनपा नगरबाह्य जलविभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण माने, माजी कनिष्ठ पर्यवेक्षक निवृत्ती कानडे, एल एण्ड टी चे निवृत्त अधिकारी दिनेश यावले, मोनाॅश युनिव्हर्सिटी आॅस्ट्रेलिया येथुन भारती लेले (पी. एच. डी. स्टुडंट), सुप्रिया खंबाटे, औरंगाबादहून रमेश देसले (ITI निवृत्त प्राध्यापक), सर्व कनिष्ठ पर्यवेक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक व इतर शिक्षक उपस्थित होते.

Previous articleपोलीस अधीक्षक गोंदिया यांचे संकल्पनेतुन “नक्षल दमन विरोधी सप्ताह” निमीत्त सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा अंतर्गत ग्राम धनेगाव येथे कृषी मेळाव्याचे आयोजन …
Next articleतेज रफ्तार से आ रहे ट्रक ने बाइक को उड़ाया, मदद के लिए फोन करता रहा मृतक, दूसरा अस्पताल में भर्ती