युवकांना कौशल्य विकासातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत : राज्यमंत्री यड्रावकर पंतप्रधान कौशल्य विकास योजना 3.0 चा शुभारंभ

73

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली (जिमाका) दि.26 : पंतप्रधान यांच्या संकल्पनेतुन पीएमकेवाय 3.0 या योजनेचा शुभारंभ दिनांक 26 जानेवारी रोजी ना.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते तर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या योजनेअंतर्गत जिल्हयातील 328 उमेदवारांना विविध कोर्सेमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास गरजेचा आहे. त्यासाठी प्रयत्न करून रोजगार निर्मिती झाल्यास युवकांच्या हाती काम येईल. त्यातून जिल्हयातील चूकीच्या मार्गाने जाणाऱ्या युवकांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणता येईल असे मत त्यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. यावेळी राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटिल यड्रावकर यांच्या हस्ते फीत कापून योजनेचा शुभारंभही करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, गडचिरोली प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रविण खंडारे उपस्थित होते. कार्यक्रमावेळी राज्यमंत्री यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली.

सदर योजनेतील प्रशिक्षण विनामुल्य आहे तसेच या योजनेअंतर्गत कुरखेडा व धानोरा येथे सुध्दा 26 जानेवारी 2021 पासून प्रशिक्षण सुरु होणार आहे. मनेरगा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व मुद्रा योजना सोबत सांगड घालुन जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. संपूर्ण देशामध्ये 08 लक्ष सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यांत येणार आहे. उमेदवारांचे वयोगट 18 ते 45 वर्ष असा निकष आहे. डिपीडीसी अंतर्गत या वर्षी 1200 युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यांत येणार आहे. तसेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारांच्या संधी प्राप्त करुन देण्याकरीता आयोजन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यांत येत आहे. तसेच गुगल मिंटच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासंबंधी मार्गदर्शन करण्यांत येत आहे. पंतप्रधान कौशल्य योजना 3.0 सन 2020-21 या आर्थिक वर्षात राबवायची असून केंद्र शासनाचा पंडित दिनदयाल उपाध्याय योजना आहे अशी माहिती यावेळी प्रविण खंडारे उपस्थितांना दिली.