भारतीय प्रजासत्ताकाचा ७२ वा वर्धापन दिन आस्की किड्स मध्ये संपन्न सत्यपाल महाराज यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती

101

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

७२ वा प्रजासत्ताक दिन आज आस्की किड्स पब्लिक स्कूल अकोट या ठिकाणी सन्मा. मिलिंदजी झाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र भूषण सत्यपाल महाराज चिंचोलकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत एल. आय. सी. चे सेवानिवृत्त डेव्हलपमेंट अधिकारी केशवरावजी बोडखे, शाळेचे सचिव नितीनजी झाडे, आस्की किड्स च्या प्राचार्या सौ. नेहा झाडे, अकॅडमिक हेड पवनजी चितोडे आणि आस्की किड्स फ्री. प्रायमरी प्राचार्य सौ. संगिता बाळापुरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात सन्माननीय अतिथी सत्यपाल महाराज चिंचोलकर तसेच केशवरावजी बोडखे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने तथा ध्वजारोहणाने झाली.
यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच आस्की किड्स च्या वर्ग 10 वी च्या विद्यार्थिनी जया जेस्वानी व अंजली जेस्वानी यांनी विशेष गीत सादर केले. सोबतच वर्ग ९ वी च्या विद्यार्थीनी आंचल बेलोकार, संस्कृती राठोड, आणि साक्षी सपकाळ या विद्यार्थ्यांनी देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या भाषणांचे सादरीकरण केले.
मान्यवरांनी देखील आपल्या मतांचे प्रदर्शन भाषाणरूपाने करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केशवरावजी बोडखे यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती सोबतच आरोग्याचे धडे देत योगासने करण्याचा सल्ला दिला.
सोबतच सत्यपाल महाराज चिंचोलकर यांनी मार्मिकदृष्ट्या आपल्या नेहमीच्या शैलीत देशभक्ती तसेच राष्ट्रनिष्ठा मुलामध्ये जागवली. आपल्या भाषणात बोलताना सत्यपाल महाराज यांनी दैववाद, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, आरोग्य, समाजकृतज्ञता, जातीयवाद सारख्या महत्वपूर्ण विषयावर टिप्पणी केली.
यावेळी मिलिंदजी झाडे यांचे अध्यक्षीय भाषण संपल्यानंतर मान्यवरांना शाळेतर्फे (token of love) प्रेमाची भेट देण्यात आली. सादर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी विवेक ताडे आणि मिताली गांधी यांनी तर आस्की किड्स च्या शालेय प्रगतीचे अहवाल वाचन सचिव नितीनजी झाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन वर्ग ९ वी ची मुलगी भाग्यश्री महल्ले हिने केले.
यावेळी आस्की किड्सचे संपूर्ण शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.